चंद्रपूर : महानगरपालिकेच्या मालमत्ता कर वसुली मोहिमेला अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने आता प्रशासनाने कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. आयुक्त विपीन पालीवाल यांनी थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करण्याचे तसेच नळ कनेक्शन खंडित करण्याचे निर्देश दिले आहेत.
कर सवलत असूनही थकबाकीदारांचे दुर्लक्ष
महानगरपालिकेने १५ फेब्रुवारीपर्यंत मालमत्ता कर भरणाऱ्यांसाठी मोठी सवलत जाहीर केली होती. ऑनलाईन कर भरणाऱ्यांना ५०% तर ऑफलाईन भरणाऱ्यांना ४५% शास्तीत सवलत देण्यात आली. मात्र, याचा लाभ केवळ ८,७३४ मालमत्ता धारकांनी घेतला. सवलतीनंतरही अपेक्षित प्रमाणात कर संकलन न झाल्याने प्रशासन कठोर कारवाईच्या मार्गावर गेले आहे.
१५ पथकांची स्थापना, दररोज १० मालमत्तांवर कारवाई
कर वसुलीला गती देण्यासाठी महापालिकेने १५ विशेष पथके गठीत केली असून, प्रत्येक पथकाने दररोज किमान १० मालमत्ता धारकांवर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जप्तीबरोबरच थकबाकीदारांचे नळ कनेक्शनही खंडित करण्यात येणार आहे.
३१ मार्चपर्यंत आणखी एक संधी
थकबाकीदारांसाठी महापालिकेने ३१ मार्चपर्यंत ऑनलाईन २५% आणि ऑफलाईन २२% शास्तीत सवलत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. नागरिकांना कर भरण्यासाठी सोयीस्कर व्हावे म्हणून ३१ मार्चपर्यंतच्या प्रत्येक सुटीच्या दिवशी मालमत्ता कर भरणा कार्यालय खुले राहणार आहे.
थकबाकीदारांसाठी इशारा
आर्थिक उत्पन्न असूनही मालमत्ता कर न भरणाऱ्या नागरिकांनी त्वरित कर भरणा करावा, अन्यथा जप्ती आणि नळ कनेक्शन खंडित करण्याची कारवाई अपरिहार्य राहील, असा इशारा चंद्रपूर महानगरपालिकेने दिला आहे.




