नागपूर : राज्याच्या विविध भागांत महायुतीला मिळालेल्या बहुमताबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांच्या अभिवादन सभा सुरू आहेत. त्या अंतर्गत, ते 20 फेब्रुवारी रोजी विदर्भ दौऱ्यावर येत असून, रामटेक येथील नगरधन मैदानावर दुपारी 4 वाजता सभेला संबोधित करणार आहेत.
याबाबतची माहिती शिवसेनेचे नेते आणि राज्याचे अर्थ राज्यमंत्री ॲड. आशिष जैस्वाल यांनी नागपूर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. त्यांनी सांगितले की, या सभेदरम्यान शिवसेनेत काही नवीन सदस्य प्रवेश करणार आहेत. त्यामुळे हा कार्यक्रम अधिक महत्त्वाचा ठरणार आहे.
या दौऱ्यात एकनाथ शिंदे हे पक्षाचे आगामी कार्य नियोजन तसेच सरकारच्या विकास योजनांबाबत संवाद साधण्याची शक्यता आहे. रामटेक आणि आसपासच्या भागातील शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने या सभेला उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे.




