अमरावती : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत गुरुवार, दि. 26 सप्टेंबर रोजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अंजनगाव सूर्जी येथे सकाळी 11 वाजता प्रशिक्षण रोजगार भरती मेळावा व इंटर्नशिप मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या संधीचा लाभ 12 वी, आयटीआय, पदविका, पदवीधर उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी घ्यावा.
योजनेचे स्वरुप :
युवक, युवतींना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची क्षमता वाढविण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राज्य शासनाव्दारे सुरू केली आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी 5 हजार 500 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे व विविध क्षेत्रातील प्रकल्प, उद्योग, स्टार्टअप्स आस्थापनांनी आवश्यक मनुष्यबळाची मागणी ऑनलाईन नोंदविल्यानुसार संबंधित आस्थापनांना त्याप्रमाणे मनुष्यबळ उपलब्ध करुन दिल्या जाणार आहे.
प्रशिक्षण योजनेंतर्गत प्रशिक्षणार्थींना शैक्षणिक अर्हतेनुसार 12 वी पास प्रशिक्षणार्थींना 6 हजार, आयटीआय, पदविका उत्तीर्णांना 8 हजार व पदवीधर, पदव्युत्तर यांना 10 हजार रुपये शासनाकडून विद्यावेतन दिले जाणार आहे. या कार्य प्रशिक्षणाचा कालावधी 6 महिने असून प्रशिक्षणार्थ्यांचे वयोमर्यादा 18 ते 35 वयोगटातील असावा. या योजनेसाठी इच्छुक उमेदवारांनी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविण्यता विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी व मार्गदर्शक सूचनांनुसार आपली नोंदणी करावी, असे आवाहन विभागाव्दारे करण्यात आले आहे.
आवश्यक कागदपत्रे :
उमेदवार हा महाराष्ट्राचा अधिवासी असावा, उमेदवारांची आधार नोंदणी असावी, उमेदवारांचे बँक खाते आधार संलग्न असावे, उमेदवाराने कौशल्य, रोजगार व उद्योजकता आयुक्तलयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा, उमेदवारांने अर्ज भरताना उपरोक्त ठिकाणापैकी एकाच ठिकाणासाठी अर्ज सादर करावा. सदर कार्य प्रशिक्षणाचा कालावधीत उमेदवारांना या योजनेंतर्गत शासनामार्फत विद्यावेतन देण्यात येणार आहे. एका उमेदवारास या योजनेचा लाभ एकदाच घेता येईल. उमेदवाराचे ज्या ठिकाणी प्रशिक्षणासाठी नेमणूक केली जाईल, ते मुख्यालय सोडता येणार नाही, यांची नोंद घ्यावी, असे संस्थेचे प्राचार्य आर.टी. शेगोकार यांनी कळविले आहे.




