चंद्रपूर : दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उत्थानासाठी व त्यांना त्यांच्या आयुष्यात सक्षम बनविण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यात विवेक जॉनसन, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनात मिशन सक्षम उपक्रम सन 2022-23 ते आजतागायत राबविल्या जात आहे.
या उपक्रमाची दखल नवी दिल्ली येथील राष्ट्रीय स्तरावरील नामांकित SKOCH Group ने घेऊन मानाचा समजला जाणारा SKOCH Gold Award-2024 हा दिव्यांग विद्यार्थ्यांच्या मिशन सक्षम उपक्रमास आज रोजी दिनांक १३ जुलै २०२४ ला प्राप्त झाला. सदर सत्कार सिल्वर ओक हॉल, इंडिया हॅबिटेट सेंटर, नवी दिल्ली येथे विवेक जॉनसन, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, चंद्रपूर यांना समारंभपूर्वक देण्यात आला.
SKOCH Group देशातील नामांकित केंद्रशासन पुरस्कृत संस्था असून जी देशातील विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांची दखल घेऊन त्यांना राष्ट्रीय सतरावरील ठरविण्यात आलेल्या निकषाच्या आधारे मूल्यांकन करून मागील अनेक वर्षापासून पुरस्कृत करते आहे.
दिनांक १३ जुलै २०२४ रोजी नवी दिल्ली येथे संपन्न झालेल्या 98 व्या SKOCH SUMMIT- PUBLIC POLICY FORUM – INDICES FOR VIKSIT BHARAT या राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमात मा. समीर कोचर, अध्यक्ष स्कॉच ग्रुप, डॉ.गुरुशरण धंजाल, उपाध्यक्ष, स्कॉच ग्रुप, डॉ.शमिका रवी, भारत सरकारच्या आर्थिक सल्लागार समिती सदस्य आणि इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत मा. श्री विवेक जॉनसन, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, चंद्रपूर यांना SKOCH Gold Award- 2024 समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला.
विवेक जॉनसन, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.चंद्रपूर यांनी हा पुरस्कार जिल्ह्यातील समस्त दिव्यांग विद्यार्थ्यांना समर्पित केला असुन, पुरस्कार स्वीकारताना दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण गुणवत्तेसाठी काम केल्याचे अत्यंत समाधान प्राप्त होत आहे अश्या भावना व्यक्त केल्या. या उपक्रमात काम करणाऱ्या माझ्या समस्त अधिकाऱ्यांचे व कर्मचाऱ्यांचे आभार मानले. या उपक्रमाची दखल राष्ट्रीय स्तरावर घेणाऱ्या SKOCH Group चे देखील आभार मानून यापुढे याहीपेक्षा दर्जेदार काम करण्याची जबाबदारी व उर्जा या पुरस्काराने मला मिळाली अशा भावना व्यक्त केल्यात.
चंद्रपूर डायट चे प्राचार्य राजकुमार हिवारे यांनी मिशन सक्षम या उपक्रमाची केलेले कार्यवाही याबाबत आपले मत व्यक्त करून सर्व यंत्रणेचे आभार मानले. या पुरस्कार सोहळ्यासाठी विशाल देशमुख, उपशिक्षणाधिकारी(प्राथमिक) जि.प.चंद्रपूर व रवींद्र तामगाडगे, जिल्हा समन्वयक, निपुण चंद्रपूर हे उपस्थित होते.