मुंबई : कर्करोगासाठीच्या भारतातील पहिल्या स्वदेशी जनुकीय उपचार पद्धती (जीन थेरपी) चे लोकार्पण राष्ट्रपती द्रौपदीमुर्मू यांच्या हस्ते भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी), मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात करण्यात आले. कार्यक्रमास राज्यपाल रमेशबैस उपस्थित होते.
‘सीएआर-टी सेल उपचार पद्धती’ सुलभतेने तसेच परवडणाऱ्या दरात उपलब्ध होणार आहे. ही उपचार पद्धती असंख्य कर्करोगग्रस्तांना नवजीवन देण्यात यशस्वी ठरणार असून संपूर्ण मानवजातीसाठी नवी आशा देणारी आहे, असा विश्वास राष्ट्रपती द्रौपदीमुर्मू यांनी व्यक्त केला.
‘सीएआर –टी’ ही उपचार पद्धती कर्करोगाशी लढत असलेल्या रूग्णांना वरदान ठरणारी असून खेळण्याच्या वयात आजाराशी झुंज देणाऱ्या लहान बालकांना कुठल्याही संजीवनीपेक्षा कमी असणार नाही, असा विश्वास राज्यपाल रमेशबैस यांनी यावेळी व्यक्त केला.