चंद्रपूर : सावकारी परवान्याचे नुतनीकरण न केल्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील 23 व्यक्तिंचा सावकारी परवाना रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित व्यक्तिंना सावकारी व्यवसाय करण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे. यात चंद्रपूर तालुक्यातील 11 व्यक्ती, राजुरा तालुक्यातील 6, ब्रम्हपूरी तालुक्यातील 2 तसेच भद्रावती, नागभीड, सिंदेवाही आणि चिमूर तालुक्यातील प्रत्येकी एका व्यक्तिचा समावेश आहे.
महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 अन्वये सावकारी परवाना नुतनीकरण 31 मार्च 2023 पूर्वी करणे बंधनकारक असते. त्यानंतर दोन महिन्यांच्या मुदतीत म्हणजे 31 मे 2023 पर्यंत अतिरिक्त शुल्क 500 रुपये भरून नुतनीकरण करता येते. मात्र त्यानंतर आलेल्या अर्जावर संबंधित सावकाराचे सहायक निबंधक, सहकारी संस्था हे अर्ज स्वीकारू शकत नाही. त्यामुळे सावकारी परवानाशिवाय संबंधित व्यक्तिंना सावकारी व्यवसाय करण्यास प्रतिबंध केला जातो. सध्या जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था कार्यालयाच्यावतीने सावकारी परवाना रद्द करण्याची प्रकिया सुरू आहे. चंद्रपूर जिल्ह्यात असे एकूण 23 व्यक्ती असून त्यांचा परवाना रद्द करण्यात आल्याचे सावकाराचे जिल्हा उपनिबंधक प्रशांत धोटे यांनी कळविले आहे.