महाराष्ट्र : युरोपियन देशांच्या मागणीप्रमाणे त्यांना कुशल मनुष्यबळ पुरविण्याचा महत्त्वपूर्ण उपक्रम महाराष्ट्र शासनाने हाती घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून जर्मनीतील बाडेन बुटेनबर्ग या औद्योगिकदृष्ट्या अतिप्रगत राज्याशी आज मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला. या करारामध्ये विज्ञान, तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, बांधकाम, ऊर्जा व पर्यावरण, आरोग्य, हॉटेल व्यवस्थापन अशा प्रमुख क्षेत्रांवर लक्ष देण्यात आले आहे.
युरोपियन देशाच्या मागणीप्रमाणे त्यांना कुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी महाराष्ट्राने पुढाकार घेतला असून या अनुषंगाने महाराष्ट्र शासन आणि जर्मनीच्या बाडेन वुटेनबर्ग राज्यादरम्यान सामंजस्य करार करून सुरुवात झाली आहे. या करारामुळे दोन्ही राज्यांमधील परस्पर संबंध अधिक दृढ होतील, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
भारत आणि जर्मनीचे अनेक दशकांपासून परस्पर संबंध आहेत. जर्मनीला कुशल मनुष्यबळाची आवश्यकता असून महाराष्ट्र ही गरज पूर्ण करण्यास समर्थ आहे. त्यादृष्टीने आज झालेला करार या संबंधांना अधिक बळकटी देणारा ठरणार आहे. या करारामुळे एका नवीन युगाची सुरुवात होणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
महाराष्ट्रात कुशल मनुष्यबळासह पायाभूत सुविधा, उत्कृष्ट दळणवळण सुविधा तसेच नवनवीन प्रकल्पांसाठी मुबलक जागा उपलब्ध आहे. महाराष्ट्र हे सर्वाधिक औद्योगिकीकरण झालेले राज्य आहे. महाराष्ट्रात मागील वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य केंद्र सुरू करण्यात आले असून त्या माध्यमातून अधिकाधिक कुशल मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, कामगार मंत्री सुरेश खाडे, संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी तसेच जर्मनीचे मिनिस्टर ऑफ स्टेट डॉ.फ्लोरियन स्टेगमन, शालेय शिक्षण, युवक आणि क्रीडा मंत्री थेरेसा स्कॉपर यांच्यासह जर्मनीचे शिष्टमंडळ उपस्थित होते.