रत्नागिरी : ज्या उमेदवारांना ट्रू वोटर ॲपद्वारे निवडणूक खर्च दाखल करणे शक्य नाही, त्यांना निवडणूक खर्चाचा हिशोब पारंपरिक पध्दतीने सादर करण्याची परवानगी देण्यात येत आहे, असे उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) शुभांगी साठे यांनी कळविले आहे.
निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी (बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांसह) निवडणूक खर्चाचा हिशोब निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर 30 दिवसांच्या आत सादर करणे आवश्यक असल्याने या निवडणुकांसाठी दिनांक 6 डिसेंबर २०२३ (निवडणुकीचा निकाल दिनांक 6 नोव्हेंबर 2023) तसेच दिनांक 7 डिसेंबर 2023 (निवडणुकीचा निकाल दिनांक 7 नोव्हेंबर 2023 नक्षलग्रस्त/दुर्गम भागासाठी) पर्यंत निवडणूक खर्चाचा हिशोब सादर करणे आवश्यक आहे.
ग्रामपंचायर्तीच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये निवडणूक खर्च सादर करण्यासाठी ट्रू वोटर ॲपचा वापर करणे अनिवार्य केले आहे. ट्रू वोटर ॲप डाऊनलोड केल्याचे प्रमाण खूपच नगण्य असल्याचे दिसून आल्याने आयोगाच्या दिनांक 21 नोव्हेंबर 2023 च्या पत्रान्वये निवडणूक खर्च दाखल करण्याचा 30 दिवसाचा कालावधी विचारात घेता, ट्रू वोटर ॲप डाऊनलोड करुन निवडणूक खर्च दाखल करण्याबाबत सर्व संबंधित उमेदवारांना तात्काळ सूचित करण्याबाबत कळविले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडील प्राप्त अहवालानुसार उमेदवारांना ट्रू वोटर ॲपमध्ये ऑनलाईन प्रोसेस करताना तांत्रिक अडचणी निर्माण होत असल्याचे कळविले आहे. ज्या उमेदवारांना ट्रू वोटर ॲपद्वारे निवडणूक खर्च दाखल करणे शक्य नाही, त्यांनी निवडणूक खर्चाचा हिशोब पारंपरिक पध्दतीने सादर करण्याची परवानगी देण्यात येत आहे.