चंद्रपूर : सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने भारतीय संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हे कार्यक्रम 15 आणि 16 ऑक्टोबर रोजी सायं. 6 वाजता प्रियदर्शनी सभागृह, चंद्रपूर येथे पार पडणार आहेत.
सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून आयोजित ‘जागर संविधानाचा’ या उपक्रमाचा उद्देश भारतीय संविधानाबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नागरिकांना प्रेरणा देणे हा आहे.
या सांस्कृतिक मालिकेचा भाग म्हणून चंद्रपूरात दोन दिवसांचा विशेष कार्यक्रम सादर होणार आहे.
15 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध गायिका व सारेगामा फेम आकांक्षा नगरकर आणि त्यांची चमू संविधानावर आधारित गीतांचे सादरीकरण करतील. तसेच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन प्रवासाचे चित्रण गीतांच्या माध्यमातून सादर करण्यात येणार आहे.
तर 16 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध शाहिरा सीमा पाटील आणि त्यांचा संच संविधानावर आधारित संगीतमय नाट्यप्रयोग सादर करणार आहेत.
या दोन्ही दिवसांचे कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सांस्कृतिक मेजवानीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभिषण चवरे यांनी केले आहे.




