पुणे – विधानसभा निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर ईव्हीएम मशीन तपासणीसंदर्भात उमेदवार प्रशांत जगताप यांनी समाजमाध्यमांवर प्रसिद्ध केलेल्या व्हिडीओतील माहितीला प्रशासनाने खंडन केले आहे. उपजिल्हाधिकारी व उपजिल्हा निवडणूक अधिकारी मिनल कळसकर यांनी स्पष्ट केले की सदर व्हिडीओमध्ये देण्यात आलेली माहिती ही भारत निवडणूक आयोगाच्या मानक कार्यप्रणालीनुसार (SOP) अयोग्य व दिशाभूल करणारी आहे.
निवडणूक आयोगाच्या नियमानुसार, निकालानंतर ७ दिवसांच्या आत उमेदवारांना ईव्हीएम मशीन्सच्या तपासणीसाठी अर्ज करण्याची तरतूद आहे. पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांपैकी ११ मतदारसंघांतील उमेदवारांनी असे अर्ज दाखल केले होते, त्यापैकी ५ अर्ज मागे घेण्यात आले असून ४ मतदारसंघांत याचिका प्रलंबित आहेत. उर्वरित २ अर्जांनुसार २५ जुलै ते २ ऑगस्ट २०२५ दरम्यान ईव्हीएम तपासणी होणार आहे.
प्रशांत जगताप यांनी २१ जुलै रोजी प्रसारित केलेल्या व्हिडीओमध्ये हडपसर मतदारसंघातील २७ मतदान केंद्रांवरील व्हीव्हीपॅट चिठ्ठ्यांची मोजणी होणार असल्याचे म्हटले होते. मात्र प्रशासनाने हे स्पष्ट केले आहे की, केवळ कंट्रोल युनिट मधील ‘रिझल्ट बटन’द्वारे मते दाखवली जातील आणि व्हीव्हीपॅट चिठ्ठ्यांची मोजणी होणार नाही.
या तपासणीदरम्यान उमेदवारांनीच तपासणीसाठी निवडलेल्या ईव्हीएम मशिन्सची यादी आधीच प्रशासनाला सादर केली असून, ती प्रक्रिया आयोगाच्या नियमांनुसार पार पडणार आहे.
सदर चुकीची माहिती देणारा व्हिडीओ प्रसारित करून जनतेमध्ये गैरसमज निर्माण केल्याबद्दल प्रशासनाने नाराजी व्यक्त केली असून अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवण्याचे आवाहन केले आहे.





