घुग्घूस (चंद्रपूर): घुग्घूस शहरात दोन दिवसांपूर्वी रात्रीच्या सुमारास तीन वर्षीय बालकावर आठ ते दहा मोकाट कुत्र्यांच्या टोळक्याने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात बालक संपूर्ण शरीरावर चावा घेऊन गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
आज दिनांक 6 जून 2025 रोजी शहर काँग्रेस पक्षाच्या वतीने काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश पाटील यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात नगरपरिषद घुग्घूसचे मुख्याधिकारी निलेश रांजनकर यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. त्यानंतर काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी नगरपरिषद कार्यालयासमोर जोरदार निषेध आंदोलन करत “नगरपरिषद मुर्दाबाद”च्या घोषणा दिल्या.
शहरात मोकाट कुत्र्यांचा प्रचंड उपद्रव वाढला आहे. प्रत्येक वॉर्डामध्ये दहा-पंधरा ते वीस मोकाट कुत्र्यांची टोळकी फिरताना दिसत असून, ते गायीच्या वासरांपासून ते लहान मुलांपर्यंत सर्वांवर हल्ले करत आहेत. यामुळे वृद्ध व पालकवर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक ज्येष्ठ नागरिक आता लाठी घेऊन बाहेर पडत आहेत, तर लहान मुलांच्या सुरक्षेबाबत पालक अत्यंत चिंतेत आहेत.
काँग्रेस पक्ष व महिला काँग्रेसने 2022 पासून याच मुद्द्यावर वारंवार निवेदने दिली असूनही नगरपरिषद प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केली नाही. याच निष्काळजीपणाचा परिणाम आज एका निष्पाप बालकाच्या जीवावर बेतला आहे, असे काँग्रेसने स्पष्ट केले.
काँग्रेसने मागणी केली की नगरपरिषदने मोकाट कुत्र्यांच्या प्रश्नावर कायमस्वरूपी उपाययोजना करावी व जखमी बालकाच्या कुटुंबाला तात्काळ आर्थिक मदत दिली जावी.
या आंदोलनात काँग्रेस नेते सैय्यद अनवर, अलीम शेख, रोशन दंतलवार, अजय उपाध्ये, विशाल मादर, शेखर तंगडपल्ली, शहजाद शेख, यास्मिन सैय्यद, पदमा त्रिवेणी, दुर्गा पाटील, संध्या मंडल, शिल्पा गोहील, नाजनीन पठाण, जोया शेख, सुगमा डोमा, लक्ष्मीबाई गोदारी, बालकिशन कुळसंगे, सुनील पाटील, दिपक पेंदोर, दीपक कांबळे, स्टिवन गुंडेटी, कुमार रुद्रारप, रोहित डाकूर, नुरूल सिद्दीकी, निखिल पुनघंटी, सुरज मिश्रा, शहंशाह शेख, अरविंद चहांदे, देव भंडारी, कपिल गोगला, गिरीश गोहिल, अनवर सिद्दीकी, सुमेश रंगारी, रंजित राखुंडे, अंकुश सपाटे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शहरात मोकाट कुत्र्यांचा प्रश्न गंभीर असून यावर तात्काळ कार्यवाही न झाल्यास काँग्रेस पक्ष अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.




