ब्रम्हपुरी (चंद्रपूर) | दिनांक 05 जून 2025 रोजी उपक्षेत्र नवेगाव अंतर्गत येणाऱ्या नियतक्षेत्र रामपुरी येथील जंगलात आज एका सब अॅडल्ट मादी बिबटाचा मृतदेह आढळून आल्याची माहिती मिळाली आहे. आज सकाळी नियमित गस्ती दरम्यान वनरक्षकांना सदर बिबट मादी मृतावस्थेत आढळली. यासंदर्भात तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच एम.बी. गायकवाड (सहाय्यक वनसंरक्षक – प्रादेशिक व वन्यजीव), गा.एस.बी. नरड (वनपरिक्षेत्र अधिकारी – उत्तर ब्रम्हपुरी), राकेश अहुजा (बायोलॉजिस्ट), डब्ल्यु.टी. नवघडे (क्षेत्र सहाय्यक – नवेगाव), पी.जे. शेंदुरकर (क्षेत्र सहाय्यक – मेंडकी) तसेच उपक्षेत्र नवेगाव व मेंडकी येथील क्षेत्रीय वनकर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
पंचनामा करून मृत बिबट्याच्या शवाचे उत्तरीय तपासणीसाठी ब्रम्हपुरी येथील विभागीय कार्यालयात नेण्यात आले आहे. सदर मादी बिबट्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर स्पष्ट होणार असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे.
वनविभागाकडून घटनेचा पुढील तपास सुरू असून मृत बिबट्याच्या आजूबाजूच्या परिसरात अधिक गस्त वाढवण्यात आली आहे.




