घुग्घुस (चंद्रपुर)– आज जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून घुग्घुस नगरपरिषदेकडून मुख्य बाजारपेठ व परिसरातील दुकानांमध्ये सिंगल यूज प्लास्टिक व थर्मोकॉलच्या वापराविरोधात विशेष जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहे.
या वर्षी संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम (UNEP) यांच्याकडून “जागतिक स्तरावर प्लास्टिक प्रदूषणाचा अंत” ही संकल्पना निश्चित करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर नगरपरिषदेकडून ठोस पावले उचलण्यात येत असून, बाजारातील सर्व दुकानदारांना सिंगल यूज प्लास्टिक व थर्मोकॉलवरील बंदीबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येत आहे.
नगरपरिषदेकडून विशेष मार्गदर्शक पॅम्प्लेट तयार करण्यात आले असून, त्यामध्ये शासनाने बंदी घालण्यात आलेल्या वस्तूंची यादी, त्याऐवजी वापरता येणाऱ्या पर्यावरणपूरक पर्यायांची माहिती, तसेच पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालयाच्या दिनांक २७ मार्च २०१८ रोजीच्या अधिसूचनेनुसार होणाऱ्या दंडात्मक कारवाईबाबतचे विवरण देण्यात आले आहे.
नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांची विशेष टीम बाजारपेठेत फिरून दुकानदारांना हे पॅम्प्लेट दाखवत आहे आणि सविस्तर माहिती देत आहे. यामागचा उद्देश म्हणजे नागरिकांमध्ये व व्यापाऱ्यांमध्ये पर्यावरण पूरक जीवनशैलीबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि प्लास्टिक प्रदूषणावर नियंत्रण मिळवणे.
https://www.facebook.com/share/p/1NmmiHyr2o
नगरपरिषद प्रशासनाने नागरिक व व्यापाऱ्यांना आवाहन केले आहे की, त्यांनी पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करून या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा व आपल्या शहराचे पर्यावरण स्वच्छ व सुरक्षित राखण्यास हातभार लावावा.




