नागपूर : बोधिसत्व नागार्जुन हे आयुर्वेद आणि रसायनशास्त्राचे जनक होते. त्यांनी आयुर्वेद क्षेत्रात महत्त्वपूर्ण संशोधन केले. मनसर टेकडीवर आजही अनेक औषधी वनस्पती आढळतात, असे प्रतिपादन दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष तथा धम्मसेना नायक भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी केले.
रामटेक येथील बोधिसत्व नागार्जुन महाविहार येथे अखिल भारतीय धम्मसेना आणि भिक्खू-भिक्खूनी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बोधिसत्व नागार्जुन बुद्ध महोत्सवात ते बोलत होते.
मनसर टेकडीतील पुरातन स्तूप आणि रहस्य
मनसर टेकडीखाली एक प्राचीन बौद्ध स्तूप आहे. या टेकडीच्या लांबी आणि खोलीबाबत अद्याप सखोल संशोधन झालेले नाही. येथे अनेक ऐतिहासिक रहस्ये दडलेली असण्याची शक्यता असून, पुरातत्त्व विभागाने तांत्रिक तपासणी करून या ठिकाणचे रहस्य उघड केल्यास पर्यटन आणि संशोधनाला मोठी चालना मिळेल, असे ससाई यांनी सांगितले.
तसेच, त्यांनी बोधिसत्व नागार्जुन यांच्या कार्याचा पुनर्विचार करण्याची गरज असल्याचे सांगत, आयुर्वेद आणि बौद्ध परंपरेचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी अधिक संशोधन आणि जनजागृती होण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
या कार्यक्रमाला विविध बौद्ध संघटनांचे प्रतिनिधी, संशोधक आणि बौद्ध अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




