नागपूर : विदर्भातील कळमेश्वर, धापेवाडा तसेच नागपूरच्या गोळीबार चौक आणि इतवारी येथील हातमाग कारागिरांच्या कौशल्याला नवे तंत्रज्ञान आणि आधुनिकतेची जोड देण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्राच्या परिसरात केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या विणकर सेवा केंद्रातर्फे आयोजित सात दिवसीय हातमाग प्रदर्शनाचे उद्घाटन आज गडकरी यांच्या हस्ते झाले. ८ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या या प्रदर्शनात हातमाग उत्पादने आणि विविध वस्त्रप्रकार सादर करण्यात आले आहेत.
या कार्यक्रमाला राज्याचे वस्त्रोद्योग आयुक्त संजय दैने, विणकर सेवा केंद्राचे उपसंचालक ठुबरीकर आणि सहाय्यक संचालक पवनीकर उपस्थित होते.
प्रदर्शनाच्या उद्घाटनावेळी हातमागाच्या पारंपरिक वस्त्रप्रकारांवर आधारीत फॅशन शो देखील आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये युवा मॉडेल्सनी विविध पारंपरिक आणि आधुनिक शैलीतील हातमागाचे पोशाख परिधान करून रॅम्पवॉक केला.
गडकरी यांनी आपल्या भाषणात विदर्भातील हातमाग उद्योगाला अधिक प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे नमूद करत, “हातमागाच्या वस्त्रांना आधुनिक स्वरूप देऊन नव्या पिढीपर्यंत पोहोचवले पाहिजे,” असे मत व्यक्त केले.
सामान्य नागरिकांसाठी हे प्रदर्शन दररोज दुपारी १ ते रात्री ९.३० पर्यंत खुले राहणार आहे. नागपूरकरांनी या प्रदर्शनाला मोठ्या संख्येने भेट देऊन स्थानिक हातमाग कारागिरांना पाठिंबा द्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.




