घुग्घुस (चंद्रपुर) : ताज बहुउद्देशीय संस्थेद्वारे संचालित इंदिरा गांधी महिला महाविद्यालय, घुग्घुस येथे ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा झाला. कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाच्या संचालिका प्रा. शहनाज अजिजखान पठान यांच्या हस्ते ध्वजारोहणाने झाली. यानंतर, राष्ट्रीय सेवा योजनेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.
बी.ए. आणि बी.कॉम. च्या विद्यार्थिनींनी देशभक्तीपर गीते, नृत्य, कविता आणि भाषणे सादर करून राष्ट्रप्रेमाची भावना प्रज्वलित केली. प्रा. शहनाज पठान यांनी अध्यक्षीय भाषणातून भारतीय संविधानाच्या वैशिष्ट्यांवर प्रकाश टाकत धर्मनिरपेक्षता आणि लोकशाहीचे महत्व अधोरेखित केले.
कार्यक्रमास महाविद्यालयाचे विश्वस्त, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेत्तर कर्मचारी, आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




