अमरावती : राज्याच्या युवा धोरणानुसार राज्य आणि जिल्हास्तरावर एक युवक, युवती आणि एक संस्थेला स्वतंत्र पुरस्कार देण्यात येते. जिल्हा युवा पुरस्कार सन 2021-22, 2022-23 आणि 2023-24 वर्षासाठी दि.15 जानेवारीपर्यंत प्रस्ताव मागविण्यात आले आहे.
पुरस्काराचे स्वरुप हे जिल्हा युवा पुरस्कारासाठी जिल्हास्तर एक युवक, एक युवती, तसेच एका नोंदणीकृत संस्थेला देण्यात येणार आहे. पुरस्कारामध्ये गौरवपत्र, सन्मानचिन्ह, रोख 10 हजार रूपये, संस्थेसाठी गौरवपत्र, सन्मानचिन्ह, रोख 50 हजार रूपये राहणार आहे.
युवक, युवतींसाठी अर्जदार युवक, युवतींचे वय पुरस्कार वर्षातील दि. 1 एप्रिल रोजी 15 वर्षे पूर्ण व दि. 31 मार्च रोजी 29 वर्षापर्यंत असावे. जिल्हास्तर पुरस्कारासाठी जिल्ह्यात सलग पाच वर्षे वास्तव्य असावे. पुरस्कार व्यक्ती किंवा संस्थेस विभागून दिला जाणार नाही. पुरस्कार मरणोत्तर जाहिर करण्यात येणार नाही. केलेल्या कार्याचे सबब पुरावे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. अर्जदार युवक, युवतीने पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर किमान दोन वर्षे क्रियाशील राहण्याचे हमीपत्र देणे आवश्यक आहे. अर्जदार व्यक्तीचे कार्य हे स्वयंस्फुर्तीने केलेले असावे. एका जिल्ह्यात पुरस्कार प्राप्त करणारी व्यक्ती राज्यातील अन्य जिल्ह्यात जिल्हा युवा पुरस्कारासाठी अर्ज करण्यास पात्र राहणार नाही. केंद्र व राज्य शासनाच्या शासकीय व निमशासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी तसेच विद्यापीठ अंतर्गत महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी पुरस्कारासाठी पात्र राहणार नाहीत.
संस्थेसाठी पुरस्कार संस्थेस विभागून दिला जाणार नाही. संस्थांनी केलेल्या कार्याचे सबब पुरावे अर्जासोबत जोडणे आवश्यक राहील. अर्जदार संस्थेने पुरस्कारप्राप्त झाल्यानंतर किमान दोन वर्षे क्रियाशील राहण्याचे हमीपत्र देणे आवश्यक आहे. अर्जदार संस्था, सार्वजनिक विश्वस्थ अधिनियम 1860 किंवा मुंबई पब्लिक ट्रस्ट अॅक्ट 1950 नुसार पंजीबद्ध असावी. अर्जदार संस्था नोंदणी झाल्यानंतर किमान पाच वर्षे कार्यरत असणे आवश्यक आहे. अर्जदार संस्थेचे कार्य हे स्वयंस्फुर्तीने केलेली असावे. एका जिल्ह्यात पुरस्कारप्राप्त करणारी संस्था राज्यातील अन्य जिल्ह्यात जिल्हा युवा पुरस्कारसाठी अर्ज करण्यास पात्र राहणार नाही. अर्जदार संस्थेच्या सदस्यांचा पोलिस विभागाने प्रमाणीत केलेला चारित्र्य दाखला देणे आवश्यक आहे.
पुरस्कारासाठी मुल्यांकनात युवा व युवा विकासाचे कार्य करणाऱ्या संस्थांनी केलेले कार्य दि. 1 एप्रिल ते 31 मार्च या कालावधीतील गत तीन वर्षाचे विचारात घेण्यात येईल. युवा अथवा नोंदणीकृत संस्थांनी ग्रामीण व शहरी भागात केलेले सामाजिक कार्य, राज्याची साधनसंपत्ती जतन व संवर्धन, तसेच राष्ट्र उभारणीच्या विकासासाठी सहायभूत ठरणारे कार्य, समाजातील दुर्बल घटक, अनुसूचित जाती, जमाती व जनजाती आदिवासी भाग आदीबाबतचे कार्य, शिक्षण, प्रौढ शिक्षण, रोजगार, आरोग्य, पर्यावरण, संस्कृती, कला, क्रीडा, मनोरंजन, विज्ञान, तंत्रज्ञान, व्यवसाय, महिला सक्षमीकरण, स्त्रीभ्रृण, व्यसनमुक्ती तसेच युवांच्या सर्वांगीण विकासाठी केलेले कार्य, राष्ट्रीय एकात्मतेस प्रोत्साहान देणारे कार्य, नागरी गलीच्छ वस्ती सुधारणा, झोपडपट्टी, आपत्ती व्यवस्थापन, तसेच स्थानिक समस्या, महिला सक्षमीकरण, साहस इत्यादी बाबतचे सर्व कार्यक्षेत्रात कार्य करणे आवश्यक आहे.
जिल्हा, पुरस्कारासाठी युवक, युवती आणि संस्थांनी करावयाचे अर्ज अर्जदारांनी दि. 15 जानेवारी 2025 पूर्वी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अमरावती येथे कार्यालयीन वेळेत सादर करावे. पुरस्काराच्या अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल, अमरावती-मार्डी रोड, तपोवन गेटजवळ, अमरावती येथे प्रत्यक्ष संपर्क साधावा, असे जिल्हा क्रिडा अधिकारी गणेश जाधव यांनी कळविले आहे.




