चंद्रपूर, दि. 8 मे: ग्रामीण भागातील सुशिक्षित व बेरोजगार युवक, पशुपालक आणि शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे. स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करून देण्यासाठी आणि शाश्वत अर्थाजनाचा पर्याय देण्यासाठी पशुसंवर्धन विभागामार्फत वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.
सन 2025-26 या आर्थिक वर्षासाठी योजनांचा लाभ घेण्यासाठी दिनांक 3 मे 2025 पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अर्ज भरण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ http://ah.mahabms.com तसेच AH-MAHABMS हे अँड्रॉइड मोबाईल अॅप्लिकेशन (Google Play Store वर उपलब्ध) वापरता येईल. अर्जाच्या स्थितीबाबत माहिती देण्यासाठी अर्जदाराच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर SMS पाठविण्यात येणार आहे, त्यामुळे मोबाईल क्रमांक बदलू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
उपलब्ध योजना खालीलप्रमाणे:
100 कुक्कुट पिल्लांचे गट वाटप
75% अनुदानावर 2 दुधाळ जनावरांचा गट (विशेष घटक योजना)
75% अनुदानावर 10 शेळया व 1 बोकड (विशेष घटक योजना)
आदिवासी योजना (TSP व OTSP अंतर्गत) अंतर्गत वरील योजनांचा लाभ
संगणकीकरणामुळे अर्ज प्रक्रिया पारदर्शक झाली असून अर्जदाराची प्रतिक्षा यादी पाच वर्षांपर्यंत प्रभावी राहणार आहे. यामुळे लाभ मिळण्याची शक्यता अधिक असून लाभार्थी योजना बाबतीत योग्य नियोजन करू शकतील.
अधिक माहितीसाठी संपर्क:
टोल फ्री क्रमांक: 1962 / 18002330418
तालुकास्तरावरील पशुधन विकास अधिकारी (वि.)
संबंधित पशुवैद्यकीय दवाखाना अधिकारी/कर्मचारी
जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद, चंद्रपूर
पशुसंवर्धन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. उमेश हिरुडकर यांनी केले आहे.
आपण या योजनांमध्ये अर्ज करणार आहात का?