पहलगाम (जम्मू-कश्मीर) येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याने देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या हल्ल्याचा मुख्य हेतू दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करून भारताच्या एकात्मतेवर घाला घालण्याचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. दहशतवादी आणि त्यांच्या समर्थकांवर कठोरात कठोर कारवाई करणे आवश्यक असल्याची जोरदार मागणी होत आहे.
या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने स्पष्टपणे सांगितले आहे की, भारताच्या अखंडतेसाठी आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी अशा देशविघातक प्रवृत्तींना कठोर शिक्षा झाली पाहिजे. सरकारने या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जे निर्णय घेतील, त्याला काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा राहील, असे काँग्रेसकडून जाहीर करण्यात आले आहे.
“भारत एक आहे आणि एकच राहील,” असा ठाम संदेश देत काँग्रेसने देशवासीयांना शांतता आणि संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ देशभरात विविध ठिकाणी मोर्चे आणि कँडल मार्चचे आयोजनही सुरू झाले आहे.
सरकारने तातडीने सुरक्षाव्यवस्था अधिक कडक करण्याचे आदेश दिले असून, जम्मू-कश्मीरमधील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. दहशतवाद्यांच्या विरोधात सुरू असलेल्या कारवाईत लवकरच ठोस यश मिळेल, असा विश्वास सरकार आणि सुरक्षा यंत्रणांनी व्यक्त केला आहे.