नागपूर: महाराष्ट्राचे शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी नागपूर महानगरपालिकेच्या कळमना हिंदी उच्च प्राथमिक शाळा क्रमांक १ संजयनगर हिंदी माध्यमिक शाळेच्या प्रेमनगर शाखेला अचानक भेट दिली. या दौऱ्यात त्यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीची पाहणी केली आणि त्यांना विविध प्रश्न विचारून त्यांचे ज्ञान तपासले.
शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे नागपूर दौऱ्यावर होते. त्यांनी शाळेत अचानक पोहोचून विविध वर्गांना भेट दिली. सर्वप्रथम इयत्ता तिसरीच्या वर्गात जाऊन त्यांनी विद्यार्थ्यांना कविता म्हणायला लावल्या. त्यानंतर इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांचे गणितीय ज्ञान तपासले. त्यांनी एका विद्यार्थ्याला डिजिटल बोर्डवर वजाबाकी सोडवण्यास सांगितले, तसेच काही विद्यार्थ्यांना वाचन करायला लावले.
विद्यार्थ्यांच्या चांगल्या शैक्षणिक प्रगतीबद्दल शिक्षणमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले आणि शिक्षकांचेही कौतुक केले. या अनपेक्षित भेटीमुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. शिक्षणाचा दर्जा सुधारावा आणि विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी असे प्रत्यक्ष निरीक्षण उपयुक्त ठरते, असेही त्यांनी सांगितले.
शालेय शिक्षण मंत्र्यांच्या या आकस्मिक भेटीने संपूर्ण शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थी भारावून गेले होते.




