Friday, November 7, 2025

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बॅडमिंटन हॉलचे लोकार्पण

चंद्रपुरात 16 एकरवर अत्याधुनिक इनडोअर स्टेडीयमची निर्मिती पी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

क्रीडा क्षेत्र आणि खेळाडूंच्या पाठीशी पूर्णशक्तीने उभे राहण्याची ग्वाही

चंद्रपूर : सन 2036 च्या ऑलिंपिकची तयारी करण्याकरिता केंद्र आणि राज्यशासन खेळाच्या विकासासाठी कटीबद्ध आहेत.त्याचा आगाज गतवर्षी चंद्रपूरात राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा घेऊन करण्यात आला. ऑलिंपिकमध्ये यश मिळवायचे असेल तर सुसज्ज स्टेडियम असणे आवश्यक आहे. त्यासाठीच चंद्रपूर शहरात म्हाडाच्या 16 एकर जागेवर 135 कोटी रुपये खर्च करून अत्याधुनिक इनडोअर स्टेडियमची निर्मिती करण्यात येत आहे, अशी माहिती राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

जिल्हा क्रीडा संकूल येथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बॅडमिंटन हॉलचे लोकार्पण करतांना ते बोलत होते. यावेळी मंचावर जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., जिल्हा पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, क्रीडा विभागाचे विभागीय उपसंचालक शेखर पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश चांडक, क्रीडा अधिकारी विनोद ठिकरे, राहुल पावडे, डॉ.मंगेश गुलवाडे, ब्रिजभुषण पाझारे, विवेक बोढे यांच्यासह विविध क्रीडा संघटनांचे पदाधिकारी, खेळाडू आणि नागरिक उपस्थित होते.

आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अत्याधुनिक बॅडमिंटन हॉलचे अधिकृत लोकार्पण झाले, असे जाहीर करून पालकमंत्री मुनगंटीवार म्हणाले, भारताने ऑलिंपिकमध्ये सन 1900 मध्ये भाग घेतला. आज आपला देश हा 140 कोटी लोकसंख्येचा आहे. मात्र ऑलिंपिक स्पर्धेमध्ये आतापर्यंत आपल्याला केवळ 35 पदक मिळाले आहेत. तेव्हाच आपण ठरवले की,ऑलिंपिकची तयारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राने आणि वाघाची भुमी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्याने केलीच पाहिजे. 2036 मध्ये चंद्रपूरचा खेळाडू जेव्हा ऑलिंपिकमध्ये पदक मिळवेल, तेव्हा खरा आनंद होईल. त्यासाठी खेळाडूंनी मेहनत करावी.आपण खेळाडूंच्या पाठीशी कायम उभे राहू, अशी ग्वाही पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी दिली.

पुढे ते म्हणाले, पूर्वीच्या काळात खेळाच्या एवढ्या सोयीसुविधा नव्हत्या. आता मात्र जिल्ह्यात आणि शहरात जेव्हा उत्तम व्यवस्था निर्माण होते तेव्हा खूप आनंद होतो. आपल्या जिल्ह्यात क्षमतेची कमतरता नाही. सन 2017 मध्ये आठ महिन्याच्या प्रशिक्षणातून आश्रम शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांनी 29 हजार फूट उंचीच्या एव्हरेस्टवर चंद्रपूरचा झेंडा फडकविला. खेळाच्या क्षेत्रात चंद्रपूर जिल्हा पुढे जावा, हाच आपला नेहमी प्रयत्न राहिला आहे. महाराष्ट्रातील तीन स्मार्ट सिंथेटिक ट्रॅक फक्त चंद्रपूर जिल्ह्यात आहेत. एक जिल्हा क्रीडा संकुल येथे, दुसरा बल्लारपूर क्रीडा संकुल येथे तर तिसरा स्मार्ट सिंथेटिक ट्रॅक सैनिक शाळेत आहे.

यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा म्हणाले, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नामुळेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील बॅडमिंटन हॉलमध्ये चांगल्या सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू येथून निर्माण होईल व आपल्या चंद्रपूरचे नाव देशात उंचावले जाईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. उपसंचालक शेखर पाटील म्हणाले, नागपूर नंतर क्रीडा विभागात सर्वाधिक काम चंद्रपूर जिल्ह्यात झाले आहे. पालकमंत्र्यांच्या पाठपुराव्यामुळेच दर्जेदार आणि मुलभूत सुविधा खेळाडूंसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यावेळी जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश चांडक यांनीसुध्दा मनोगत व्यक्त केले.

प्रास्ताविकात जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांनी, आंतरराष्ट्रीय स्तराच्या बॅडमिंटन हॉलचा प्रस्ताव जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी क्रीडा मंत्रालयाकडून मंजूर करून घेतला. क्रीडा संकुलाच्या विकासासाठी 57 कोटींच्या प्रस्तावाला ही मान्यता मिळाली आहे. क्रीडा विभागासाठी भरीव तरतूद पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळेच शक्य झाली आहे, असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे संचालन उत्तम आवळे यांनी तर आभार तालुका क्रीडा अधिकारी विनोद ठिकरे यांनी मानले.

प्रत्येक तालुक्यात अत्याधुनिक जीम
आरोग्याचा खर्च कमी करायचा असेल तर महाराष्ट्रातील सर्व तालुक्यात अत्याधुनिक स्टेडियम आणि जीम करण्याच्या सूचना आपण वित्तमंत्री असताना केल्या होत्या. बल्लारपूर, मूल, पोंभुर्णा येथे अत्याधुनिक जिमची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यातील 15 ही तालुक्यात अत्याधुनिक जीम तयार करण्यात येत आहे.

जिल्ह्यात विविध खेळांसाठी स्टेडीयमची निर्मिती
57 कोटी खर्च करून चंद्रपूरचे स्टेडिअम उभारण्यात येत आहे. बल्लारपूर येथे साडेसहा कोटीचे स्टेडियम, एफडीसीएम येथे उत्कृष्ट स्टेडियम, कबड्डी करिता आणि कुस्तीसाठी जिल्ह्यामध्ये दोन छोटे छोटे अत्याधुनिक स्टेडियम आणि एस.एन.डी.टी. विद्यापीठात पारंपारिक खेळांसाठी नाविन्यपूर्ण स्टेडियम तयार करण्यात येत आहे. आणि भविष्यात नेमबाजी साठी अत्याधुनिक स्टेडीयम करण्याचा आपला मानस असल्याचे मुनगंटीवार म्हणाले.

देखभाल दुरुस्तीकडे विशेष लक्ष द्यावे
जिल्हा क्रीडा संकूल येथे आज उद्घाटन झालेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बॅडमिंटन हॉलचा खेळाडूंनी चांगला उपयोग घ्यावा. तसेच या हॉलची देखभाल दुरुस्तीसाठी सर्वांनी लक्ष देणे गरजेचे आहे, अशा सुचना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या.

राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंचा सत्कार
राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर विविध खेळांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणा-या खेळाडूंचा यावेळी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यात आदर्श मास्टे, श्रेया इथापे, किंजल भगत, रुक्साना सलमाने, कृष्णा रोहणे यांच्यासह खेलो इंडिया प्रशिक्षक रोशन भुजाडे यांचाही समावेश होता.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News