अलिबाग : पाण्यात बुडणाऱ्या व्यक्तींचे प्राण वाचविण्यासाठी उपयुक्त ठरत असलेल्या “रोबोटिक बोयो” या आधुनिक जीवरक्षक यंत्राचे प्रात्यक्षिक पाहण्यासाठी कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांनी नागाव बीच येथे भेट दिली. यावेळी त्यांनी या यंत्राच्या कार्यपद्धतीची सविस्तर माहिती घेत “रोबोटिक बोयो” खऱ्या अर्थाने जीवनरक्षक ठरत असल्याची उत्स्फूर्त प्रतिक्रिया व्यक्त केली.
या प्रात्यक्षिकावेळी जिल्हा परिषद सदस्य डॉ. सचिन राऊळ, जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के, उपजिल्हाधिकारी डॉ. रवींद्र शेळके, तहसीलदार विक्रम पाटील, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक तसेच जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषदेचे कर्मचारी उपस्थित होते.
भेटीदरम्यान विभागीय आयुक्तांनी नागाव बीचवरील पर्यटकांसाठी उपलब्ध सोयीसुविधांचा आढावा घेतला. बीच परिसरातील शौचालयांची संख्या वाढविणे, स्वच्छता राखणे आणि पर्यटकांसाठी अधिक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत त्यांनी प्रशासनाला आवश्यक सूचना दिल्या.
तसेच, बीचवर येणाऱ्या पर्यटकांची माहिती संकलित करण्यासाठी प्रभावी यंत्रणा उभारण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने आपत्ती व्यवस्थापन अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने “रोबोटिक बोयो” उपयुक्त ठरणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.




