१०७८ विद्यार्थ्यांचा सहभाग
चंद्रपूर : श्रीगुरुदेव सेवाश्रम नागपूर अंतर्गत राष्ट्रसंत साहित्य अभ्यास मंडळ द्वारा आयोजित आणि राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेच्या सहकार्याने गेल्या १८ ऑगस्ट २०२४ रोजी चंद्रपूर जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा निःशुल्क होती तर इयत्ता ८ ते १० च्या विद्यार्थ्यांसाठी निबंधाचा विषय होता ‘गाव हा विश्वाचा नकाशा’ तर इयत्ता ११ते १२च्या विद्यार्थ्यांसाठी निबंधाचा विषय होता. ‘ग्रामगीतेतील आदर्श जीवनमुल्ये’. संबंधित विषयावर एक हजार शब्दांचा निबंध प्रत्यक्ष केंद्रावर येऊन लिहायचा होता. सदर निबंध स्पर्धा जिल्हास्तरावर मातोश्री विद्यालय तुकुम येथे आयोजित करण्यात आली होती. तसेच तालुकास्तरावरही सदर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
आयोजन समितीत सदस्य म्हणून डॉ.धर्मा गावंडे, प्रा.नामदेव मोरे घुग्घुस, एड.राजेंद्र जेनेकर राजुरा, डॉ.श्रावण बानासुरे बल्लारपूर, ग्राम.नामदेव पिज्दूरकर मुल, कार्तिक चरडे, देवराव कोंडेकर, चंद्रपूर, रोहिणी मंगरूळकर, निलेश माथनकर, प्रभाकर आवारी, रिया पिपरीकर, सरोज साहू, श्रध्दा कुमरे आदींचा सहभाग होता. जिल्ह्यातील निबंध स्पर्धेचे केंद्र होते मातोश्री विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय चंद्रपूर, विकास विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय विहिरगाव ता.सावली, नवभारत विद्यालय मुल, देवनिल विद्यालय टेकाडी ता.मुल, महिला महाविद्यालय बल्लारपूर, एफ.ई.एस. विद्यालय चंद्रपूर, छोटू भाई पटेल कनिष्ठ महाविद्यालय चंद्रपूर, लोकमान्य टिळक विद्यालय चंद्रपूर, लोकमान्य टिळक कन्या विद्यालय चंद्रपूर, जनता विद्यालय घुग्घुस, राजीव गांधी कनिष्ठ महाविद्यालय चंद्रपूर, वैभव कॉन्व्हेंट बल्लारपूर शाखा क्रं.१ व २ इत्यादी ठिकाणी स्पर्धा घेण्यात आली. संपूर्ण जिल्ह्यात संपन्न झालेल्या या स्पर्धेत एकूण १०७८ विद्यार्थी सहभागी झाले होते. मातोश्री विद्यालयात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून स्पर्धेस प्रारंभ झाला. यावेळी गोंडवन शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष एड.रविंद्र खनके, जनरल सेक्रेटरी प्रा. सुर्यकांत खनके, ग्राम.बंडोपंत बोढेकर, राजेंद्र हजारे, मुख्याध्यापक संजय बिजवे, पर्यवेक्षक प्रविण रोकमवार, प्रभाकर आवारी, ग्राम. नन्नावरे आदींची उपस्थिती होती.




