महासंस्कृती महोत्सवाचे थाटात उद्घाटन; ढोलताशासह सुप्रसिद्ध सिनेगायक सुदेश भोसले यांच्या गायनाने महोत्सवाचा शुभारंभ
अमरावती : महासंस्कृती महोत्सवाच्या माध्यमातून स्थानिक कलाकारांना आपल्या कला सादर करण्याची संधी देण्यात आली आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून महाराष्ट्राची कला, परपंरा व संस्कृती तरुण पिढीपर्यंत पोहोचवून त्यांची जोपासना करण्यास मदत होईल, असे प्रतिपादन खासदार नवनीत राणा यांनी महासंस्कृती महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी केले.
पर्यटन, सांस्कृतिक कार्य विभाग व जिल्हा प्रशासनाच्यावतीने दि.18 ते 22 फेब्रुवारी या कालावधीत सायन्स स्कोर मैदानावर महासंस्कृती महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. विशेष पोलिस महानिरीक्षक रामनाथ पोकळे, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, अपर जिल्हाधिकारी सुरज वाघमारे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, उपायुक्त संजय पवार, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
खासदार नवनीत कौर म्हणाल्या की, महाराष्ट्राची साहित्य, कला, परपंरा व संस्कृतीची जपवणूक व्हावी यासाठी राज्य शासनाच्यावतीने संपूर्ण राज्यभर महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून लुप्त होत चाललेली परंपरागत कलागुण, कौशल्य, आदिवासी कला, संस्कृती तरुण पिढीच्या स्मरणात राहून संस्कृतीची जपणूक होण्यास आपसूकच मदत होईल. या महोत्सवात जिल्ह्यातील स्थानिक कलाकारांना आपल्या कला सादर करण्याची संधी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी या महासंस्कृती महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
पाच दिवसीय सांस्कृतिक महोत्सवामध्ये आदिवासी समाजातील लुप्त होत चाललेल्या कला, परंपरा, लोककलांना प्रोत्साहन देण्यात आले आहे. तसेच स्थानिक कलाकारांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यात आले आहे. अमरावती जिल्हाचा सांस्कृतिक जिल्हा म्हणून नावलौकिक आहे. त्यामुळे कलाकारांनी आपली कला येथील स्थानिक, तरुण पिढीपर्यंत पोहोचवावी. समस्त जिल्हावासियांनी या महोत्सवाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी यावेळी केले.




