बुलडाणा : जिल्हा नियोजन समिती कार्यालयात कंत्राटी पद्धतीने 11 महिन्यांसाठी डाटा एंट्री ऑपरेटरची 3 पदे भरण्यात येणार असून, पात्र व इच्छुक उमेदवारांनी सर्व कागदपत्रांसह आपले परिपूर्ण भरलेले अर्ज 7 जानेवारी 2024 पर्यंत जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय येथे पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गरजू व पात्र उमेदवार हा कमाल 40 वर्षाचा असावा. तो कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा. उमेदवार एमएस-सीआयटी परीक्षा उत्तीर्ण असावा. त्याला संगणक हाताळणी व ज्ञान असणे आवश्यक असून, तो मराठी व इंग्रजी टायपिंग प्रमाणपत्र असल्यास प्राधान्य देण्यात येईल तसेच तो बुलडाणा जिल्ह्यातील स्थानिक रहिवासी असावा. उमेदवारास किमान 1 वर्ष संगणक प्रणाली हाताळण्याचा अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल. तसेच मराठी व इंग्रजी पत्रव्यवहार, विविध वेब बेस्ड पोर्टलवर डाटा एंट्री करणे, विविध बैठकांची तांत्रिक जबाबदारीची कामे (उदा. प्रोजेक्टर स्क्रीन, संगणक इ. संबंधीत तांत्रिक बाबी, प्रेझेंटेशनची हाताळणी करणे), जिल्हाधिकारी व जिल्हा नियोजन अधिकारी यांनी सांगितलेली विविध कामे त्याला सफाईदारपणे करता येणे आवश्यक आहे. उमेदवारास 18 हजार 840 रुपये मानधन देण्यात येईल. तरी इच्छुक उमेदवारांनी त्यांचे अर्ज (resume व आवश्यक कागदपत्रांसह) जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, बुलढाणा येथे दि. 7 जानेवारी 2024 पर्यंत पाठवावीत, असे आवाहन प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.