पोलीस प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन
चंद्रपूर : शहरात सार्वजनिक गणेशोत्सव विसर्जनाचा कार्यक्रम दि. 28 सप्टेंबर 2023 रोजी पार पडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येत आहे.
मुंबई पोलीस अधिनियम-1951 च्या कलम 33 (1)(ब) नुसार सार्वजनिक ठिकाणाची रहदारी व सुव्यवस्था राखण्यासाठी व करावयाच्या नियमनासाठी शहरामध्ये सार्वजनिक गणेशोत्सव विसर्जनाच्या कार्यक्रमाच्या रहदारीला अडथळा होऊन जनतेला त्रास होवू नये, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणुन चंद्रपूर शहरातील मुख्य मिरवणुकीचा मार्ग दि. 28 सप्टेंबर रोजी सकाळी 6 वाजेपासुन ते दि. 29 सप्टेंबर रोजीचे पहाटे 6 वाजेपर्यंतच्या कालावधीसाठी सर्व प्रकारच्या वाहनांची रहदारी वळविण्यात येत आहे, असे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी कळविले आहे.
गणेश विसर्जन मुख्य मिरवणुक सोहळा पार पडेपर्यंत प्रियदर्शनी चौक ते जटपुरा गेट-कस्तुरबा चौक मार्गे गांधी चौक ते जटपुरा गेट मार्गे, रामनगर रोड मार्गे संत केवलराम चौक-इरई नदी (दाताळा पुल) हा रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांना बंद करण्यात येत आहे. नागपूर रोडने येऊन बल्लारशा किंवा मुलकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने ही प्रियदर्शनी चौकाकडे जाण्यास बंदी करून सर्व प्रकारची वाहने ही वरोरा नाका उड्डानपूल-सावरकर चौक ते बंगाली कॅम्प, मुल किंवा बल्लारशाकडे जातील.
मुल किंवा बल्लारशाकडुन नागपूरकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने ही बंगाली कॅम्प -सावरकर चौक, वरोरा नाका नवीन उड्डाणपुल मार्गे नागपूरकडे जातील. नागपूरकडुन शहरामध्ये जाणारी सर्व वाहने (जड वाहने वगळून) छोटा नागपुर मार्गे दाताळा चौक-देवाळा गांव-चोराळा टी पॉइंटवरून बिनबा गेट किंवा पठाणपुरा गेट मधुन शहरात प्रवेश करतील. चंद्रपुर शहर पोलीस स्टेशन हद्दीतील रहीवाशांनी नागपुर, वणी, घुग्घुस व गडचांदुरकडे जाण्याकरीता रहमत नगर, नगीनाबाग व इतर परीसरातुन जाण्यासाठी बिनबा गेट-चोराळा-दाताळा आदी मार्गाचा अवलंब करावा. बल्लारशा व मुलकडुन येणा-या सर्व वाहनांना (जड वाहने वगळून) शहरामध्ये जायचे असल्यास बसस्टँड-एलआयसी ऑफीस- बगड खिडकी मार्गे किंवा जुनोना चौकातुन शहरामध्ये किंवा प्रसन्ना पेट्रोल पॅम्पकडुन बाबुपेठ मार्गे शहरात फक्त अंचलेश्वर गेटपर्यंत प्रवेश करता येईल.