गोंदिया: दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर विभागांतर्गत गोंदिया रेल्वे स्थानकाच्या दक्षिण दिशेला, प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर पेड एसी वेटिंग रूम सुविधा सुरू करण्यात आली आहे. सर्व श्रेणीतील प्रवाशांना अधिक आरामदायी आणि सुरक्षित प्रतीक्षालय मिळावे या उद्देशाने ही सेवा प्रथमच उपलब्ध करून देण्यात आली आहे.
याआधी अस्तित्वात असलेल्या प्रतीक्षालयाचे संपूर्ण नूतनीकरण करण्यात आले असून, आता त्याच्या जागी अत्याधुनिक सुविधा असलेले वातानुकूलित प्रतीक्षालय उभारण्यात आले आहे. या प्रतीक्षालयात प्रवाशांसाठी आरामदायी बैठक व्यवस्था, मोबाइल चार्जिंग पॉईंट्स, स्वच्छतागृह आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना अधिक चांगल्या सोयी-सुविधा पुरवण्याच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. गोंदिया स्थानकावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या सेवेमुळे अधिक सोईस्कर अनुभव मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.




