जळगाव : विद्यार्थ्यांनी सिगारेट व इतर व्यसनांपासून दूर राहावे, वाहतुकीचे नियम पाळावेत, आणि पोलिस दलात करिअर घडवण्यासाठी प्रयत्नशील रहावे, असे मार्गदर्शन पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी केले. महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त आयोजित शस्त्र, श्वान पथक, वायरलेस, पोलीस बॅण्ड, बॉम्ब शोधक व नाशक पथकाचे प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
याप्रसंगी व्यासपीठावर अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, पोलीस उपअधीक्षक संदीपकुमार गावीत, जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.च्या पर्सोनेल विभागाचे वरिष्ठ व्हाईस प्रेसिडेंट सी. एस. नाईक, युवाशक्ती फाऊंडेशनचे विराज कावडिया उपस्थित होते. त्यासोबत शनिपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आर.टी.धारबळे, रामानंदचे राहुल गुंजाळ, तालुका पोलीस स्टेशनचे संजय गायकवाड, शहर पोलीस स्टेशनचे अनिल भवारी, मुख्यालयातील राखीव पोलीस उपनिरीक्षक मंगल पवार, पीएसआय राजेश वाघ यांच्यासह अधिकारी व पोलीस दलातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जळगाव जिल्हा पोलीस दल, भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शस्त्र प्रदर्शना ७००० च्यावर विद्यार्थ्यांनी भेट देऊन पोलीसांशी संवाद साधला आणि शस्त्रांसंबंधित माहिती समजून घेतली. हा उपक्रम गेल्या १० वर्षांपासून जळगावकरांसाठी आयोजित केला जातो. शस्त्र प्रदर्शनातून पोलीस दलाची ओळख झाली. शस्त्र प्रदर्शनात विद्यार्थ्यांना पोलीस दलातील अत्याधुनिक शस्त्रसामग्री, उपकरणे आणि तंत्रज्ञानाची माहिती देण्यात आली. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये पोलीस दलातील जबाबदाऱ्या आणि संधींबाबत उत्सुकता निर्माण झाली.
विद्यार्थ्यांना बीडीएस विभागातील प्रकाश महाजन, नरेंद्र ठाकूर, आशिफ पिंजारी, पंकज सोनवणे, रामदास साळुंखे, राखीव पोलीस दलातील आशिष चौधरी, दीपक पाटील, संतोष सुरवाडे, सुभाष धिरबस्सी, अजित तडवी यांच्यासह क्युआरटी टीम, आरसी प्लाटुन नं.७ मधील कर्मचाऱ्यांनी शस्त्रांविषयी माहिती समजून सांगितली. पोलीस बँड पथकाने विशेष सादरीकरण यावेळी केले.




