Friday, April 24, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

चंद्रपूर महानगरपालिका महापौर–उपमहापौर निवडणूक : राजकीय हालचालींना वेग, १६ नामनिर्देशन दाखल

चंद्रपूर | चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाच्या निवडीसाठी नामनिर्देशन दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून, राजकीय वर्तुळात चांगलीच हालचाल निर्माण झाली आहे. सकाळी ११ ते दुपारी ३ या निर्धारित वेळेत महापौर पदासाठी एकूण १०, तर उपमहापौर पदासाठी ६ नामनिर्देशन पत्रे दाखल झाली आहेत.

महापौर पदासाठी दाखल झालेल्या नामनिर्देशनांमध्ये भारतीय जनता पार्टीकडून सर्वाधिक ५, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून ४, तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून १ नामनिर्देशन दाखल झाले आहे. त्यामुळे महापौरपदाची लढत बहुरंगी व चुरशीची ठरण्याची शक्यता आहे.

महापौर पदासाठी उमेदवारी दाखल करणाऱ्यांमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून मनस्वी संदीप गिऱ्हे, काँग्रेसकडून संगीता मंगल भोयर, संगीता गोपालकृष्ण अमृतकर, सुनंदा दिलीप धोबे व वैशाली अजय महाडूळे यांचा समावेश आहे. भाजपकडून संगीता राजेंद्र खांडेकर यांनी ३ अर्ज, तर सारिका सचिन संदुरकर यांनी २ अर्ज दाखल केले आहेत.

दरम्यान, उपमहापौर पदासाठी दाखल झालेल्या ६ नामनिर्देशनांमध्ये भाजप व काँग्रेसकडून प्रत्येकी २, भारतीय शेतकरी कामगार पक्षाकडून १ आणि एका अपक्ष उमेदवाराचा समावेश आहे. उपमहापौर पदासाठी अपक्ष उमेदवार प्रशांत आनंदराव दानव, शेतकरी कामगार पक्षाकडून प्रदीप शंकर देशमुख, काँग्रेसकडून वसंत राजेश्वर देशमुख व राहुल गेंदलाल चौधरी, तर भाजपकडून संजय नारायण कंचर्लावार (२ अर्ज) यांनी उमेदवारी दाखल केली आहे.

महापौर व उपमहापौर पदांच्या निवडीसाठी १० फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता मनपा राणी हिराई सभागृहात विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेचे अध्यक्षस्थान जिल्हाधिकारी तथा पिठासीन अधिकारी विनय गौडा जी.सी. भूषविणार आहेत. सभेत नामनिर्देशन पत्रांची छाननी करण्यात येणार असून, त्यानंतर वैध उमेदवारांची नावे जाहीर केली जातील. छाननीनंतर १५ मिनिटांच्या कालावधीत उमेदवारी मागे घेण्याची संधी देण्यात येणार आहे.

यानंतर अंतिम उमेदवारांची नावे घोषित करून हात वर करून मतदान प्रक्रिया पार पडणार असून, संपूर्ण प्रक्रियेनंतर पिठासीन अधिकारी निवडणुकीचा अंतिम निर्णय जाहीर करतील. चंद्रपूर महानगरपालिकेच्या सत्ताकारणाचा कौल कोणाच्या बाजूने लागतो, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News