नायलॉन मांजाविरोधात कडक संदेश, सुरक्षित व पर्यावरणपूरक सण साजरे करण्याचे आवाहन
घुग्घुस, चंद्रपुर | पर्यावरण संरक्षण, नागरिकांची सुरक्षितता तसेच पशु-पक्ष्यांचे संवर्धन या उद्देशाने घुग्घुस नगर परिषद, स्वच्छ सर्वेक्षण २०२५–२६, माझी वसुंधरा अभियान ६.० आणि घुग्घुस पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने नायलॉन मांजाच्या वापराविरोधात कडक भूमिका घेतली आहे. यासंदर्भात सर्व कर्मचारी तसेच नागरिकांना नायलॉन मांजा वापरू नये, तसेच सुरक्षित व पर्यावरणपूरक पद्धतीने सण साजरे करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाने २६ डिसेंबर २०२५ रोजी जारी केलेल्या अधिकृत पत्रकानुसार, नायलॉन मांजाच्या वाढत्या वापरामुळे गंभीर अपघात घडत असून अनेक नागरिक जखमी होत आहेत, तर काही प्रकरणांमध्ये जीवितहानीही होत आहे. या पार्श्वभूमीवर मा. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्देशानुसार नायलॉन मांजाच्या वापरावर आणि विक्रीवर कडक निर्बंध घालण्यात आले आहेत.
पत्रकानुसार, नायलॉन मांजा वापरताना अल्पवयीन मुलगा आढळल्यास त्याच्या पालकांकडून ५० हजार रुपयांचा दंड, प्रौढ व्यक्तीकडून ५० हजार रुपयांचा दंड तसेच नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या विक्रेत्याकडून प्रत्येक उल्लंघनासाठी २ लाख ५० हजार रुपयांपर्यंत दंड आकारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ही कारवाई थेट न्यायालयात दंड जमा करण्याच्या स्वरूपात करण्यात येणार आहे.
या अनुषंगाने घुग्घुस नगर परिषदेतर्फे सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना नायलॉन मांजा वापर न करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले असून, नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाणार आहे. “सुरक्षित सण, स्वच्छ पर्यावरण आणि जीवांचे संरक्षण” हा संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचा निर्धार प्रशासनाने केला आहे.
तसेच नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, नायलॉन मांजाची खरेदी-विक्री, वापर किंवा साठवणूक करणारा कोणी आढळल्यास तात्काळ पोलीस नियंत्रण कक्ष, चंद्रपूर किंवा पोलीस हेल्पलाईन ११२ वर संपर्क साधून माहिती द्यावी.
नायलॉन मांजामुक्त सण साजरे करून पर्यावरण, मानव आणि निरपराध पशु-पक्ष्यांचे संरक्षण करण्यासाठी प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन घुग्घुस नगर परिषद व पोलीस प्रशासनाने केले आहे.




