चंद्रपूर – आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर यंदाही चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे चांदा क्लब येथे श्री गणेश मूर्ती प्रदर्शनी व विक्रीचे आयोजन करण्यात आले आहे. श्री गणेश मूर्ती दुकानांवर होणारी गर्दी आणि त्यातून निर्माण होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हे नियोजन करण्यात आल्याचे मनपा आयुक्त विपीन पालीवाल यांनी सांगितले.
मोठ्या प्रमाणात साजऱ्या होणाऱ्या या उत्सवात बहुतेक घरी गणेशमूर्तींची स्थापना केली जाते. यासाठी नागरिकांना गर्दीच्या भागात मूर्ती खरेदीसाठी जावे लागत होते. मात्र मागील वर्षी प्रायोगिक तत्वावर चांदा क्लब मैदानावर मूर्तिकारांना मूर्ती विक्रीसाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली होती, ज्यास नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यामुळे यंदाही हीच व्यवस्था करण्यात येणार आहे.
चांदा क्लब येथील स्टॉल्स व पंडाल व्यवस्था मूर्ती विक्रेत्यांना स्वतः करावी लागणार असून, वीजपुरवठा, स्वच्छतागृह, पाणीटँकर, स्वच्छतेची सोय मनपातर्फे केली जाणार आहे. नोंदणीशिवाय मूर्ती व साहित्य विक्री करणारे तसेच फुटपाथवर विक्री करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई केली जाणार आहे.
मोठ्या प्रमाणात होणाऱ्या गर्दी, पार्किंगच्या समस्यांमुळे नागरिकांना मूर्ती खरेदी करताना अडचणी येतात. मात्र चांदा क्लब मैदानावर उपलब्ध होणाऱ्या प्रशस्त जागेमुळे नागरिकांना परिवारासह मोकळ्या वातावरणात, गर्दी टाळून खरेदी करता येणार आहे.
विशेष म्हणजे, येथे मूर्ती खरेदी करणाऱ्या नागरिकांना लकी ड्रॉ कुपन दिले जाणार असून, 8 भाग्यवान विजेत्यांना इस्त्री, मिक्सरसारख्या घरगुती वस्तूंची बक्षिसे मिळतील.
गर्दीमुक्त आणि सुखद वातावरणात श्री गणेशाचे आगमन व्हावे यासाठी चंद्रपूर मनपातर्फे नागरिकांनी चांदा क्लब येथूनच गणेशमूर्ती खरेदी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.





