घुग्घुस (चंद्रपूर) : देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल केलेल्या कथित अपमानस्पद वक्तव्याचा तीव्र निषेध करण्यासाठी घुग्घुस काँग्रेस कमिटीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी यांच्या नेतृत्वाखाली डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी “बाबासाहेब जिंदाबाद” आणि “अमित शहा निषेध” अशा घोषणा देत गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.
या निषेध आंदोलनात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सैय्यद अनवर, नारायण ठेंगणे, शामराव बोबडे, जिल्हा महासचिव अलीम शेख, माजी उपसरपंच हनिफ शेख, राष्ट्रवादीचे दिलीप पिट्टलवार, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष रोशन दंतलवार, तालुका सचिव विशाल मादर, एन.एस.यु.आय. अध्यक्ष आकाश चिलका, महिला जिल्हा उपाध्यक्ष यास्मिन सैय्यद, शहर अध्यक्ष संगीता बोबडे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा आणि संविधानाचा अपमान सहन केला जाणार नाही, असा संदेश देत या आंदोलनाद्वारे गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यात आला.




