मुंबई : जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांचे मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन आणि लोकार्पण करण्यात आले.
२३९ झोपडपट्टी धारकांना एसआरएच्या माध्यमातून त्यांच्या हक्काच्या घरांचे चावीवाटप करण्यात आले. आरे कॉलनीत ६५ कोटी रुपयांच्या अंतर्गत रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले. मुंबई महानगरपालिकेच्या के- उत्तर वॉर्डच्या नवीन प्रशासकीय कार्यालयाचे लोकार्पणदेखील यावेळी करण्यात आले.
महापालिकेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या नवीन प्रभाग कार्यालयामुळे अनेक सोयी-सुविधा एकाच जागी उपलब्ध होणार आहेत. मुंबईत देखील सर्व रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्याचा निर्णय आम्ही घेतला असून ते कामही वेगाने सुरू आहे. तसेच मुंबईकरांकरिता सुरु करण्यात आलेल्या बाळासाहेब ठाकरे आपला दवाखानाच्या माध्यमातून लाखो रुग्णांना मोफत उपचार मिळत असल्याचे सांगत राज्य शासनाने गेल्या दोन वर्षात कायमच सर्वसामान्य माणसाला न्याय देणारे निर्णय घेतले आहेत, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
यावेळी खासदार रवींद्र वायकर, मुंबई महानगरपालिकेच्या के पूर्व विभागाचे सहायक आयुक्त मनीष वळंजू आदी मान्यवर उपस्थित होते.




