परभणी : महसूल पंधरवाडा 2024 अंतर्गत आज सोमवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय’ हा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती अनुराधा ढालकरी, उपविभागीय अधिकारी संतोषी देवकुळे आणि नायब तहसीलदार प्रशांत वाकोडकर यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिकारी–कर्मचाऱ्यांनी सहभागी होत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात स्वच्छता मोहीम राबविली. महसूल विभागाकडून देण्यात येणाऱ्या सेवा आणि विभागाद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजना याबाबत जिल्ह्यातील नागरिकांना अधिकाधिक माहिती प्राप्त होऊन त्यांना योग्य लाभ घेता यावा. त्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार महसूल पंधरवाड्यात आज हा उपक्रम राबविण्यात आला. जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे आणि उपस्थित अधिकाऱ्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात वृक्षारोपणही करण्यात आले.
महसूल पंधरवाड्यात राबविण्यात येणारे विविध उपक्रम
सोमवारी (दि.5) कृषि मार्गदर्शन कार्यक्रम, 6 ऑगस्टला शेती, पाऊस आणि दाखले, 7 ऑगस्टला युवा संवाद, 8 ऑगस्टला महसूल-जन संवाद, 9 ऑगस्टला महसूल ई-प्रणाली, 10 ऑगस्टला सैनिक हो तुमच्यासाठी, 11 ऑगस्टला आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन, 12 ऑगस्टला एक हात मदतीचा, दिव्यांगाच्या कल्याणाचा, 13 ऑगस्टला महसूल अधिकारी, कर्मचारी यांचे प्रशिक्षण, 14 ऑगस्टला महसूल पंधरवाडा वार्तालाप तर 15 ऑगस्ट रोजी महसूल संवर्गातील कार्यरत सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी संवाद, उत्कृष्ट अधिकारी कर्मचारी पुरस्कार वितरण व महसूल पंधरवाडा सांगता समारंभाचा कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी कळविले आहे.