गडचिरोली : महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात माओवादाविरोधातील मोहिमेला मोठे यश मिळाले असून, गडचिरोली पोलीस आणि छत्तीसगडमधील नारायणपूर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत माओवाद्यांचा शस्त्रास्त्र निर्मिती कारखाना उद्ध्वस्त केला आहे. आत्मसमर्पित माओवाद्यांकडून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे “ऑपरेशन अंतिम प्रहार” अंतर्गत ही आंतरराज्यीय मोहीम राबविण्यात आली.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, माओवाद्यांकडून सुरक्षा दलांवर घातपात करण्यासाठी जंगल परिसरात गुप्तपणे शस्त्रास्त्र निर्मिती व साठवण केली जात होती. आंतरराज्यीय सीमावर्ती दुर्गम जंगलाचा फायदा घेत विविध प्रकारचे शस्त्र आणि स्फोटक साहित्य तयार करून ते जमिनीत लपवून ठेवले जात होते. निवडणुका, नक्षल सप्ताह तसेच इतर संवेदनशील काळात या साहित्याचा वापर सुरक्षा दलांवर हल्ल्यासाठी केला जात असल्याची माहिती तपासात समोर आली आहे.
दिनांक 23 मे 2026 रोजी करण्यात आलेल्या कारवाईनंतर पुन्हा 27 मे 2026 रोजी संयुक्त शोधमोहीम राबविण्यात आली. या कारवाईदरम्यान जंगल परिसरात लपवून ठेवलेला मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या साहित्यामध्ये 01 इन्सास रायफल, 02 सिंगल शॉट रायफल, 02 बारा बोअर रायफल तसेच एकूण 18 जिवंत काडतुसे यांचा समावेश आहे.
याशिवाय, माओवाद्यांकडून वापरले जाणारे विविध साहित्य, उपकरणे आणि शस्त्रनिर्मितीसाठी लागणारे साहित्य घटनास्थळीच नष्ट करण्यात आले. या कारवाईमुळे माओवादी संघटनांच्या हालचालींना मोठा धक्का बसल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
गडचिरोली जिल्ह्यात माओवादी चळवळ जवळपास संपुष्टात आली असून, सुरक्षा दलांच्या सातत्यपूर्ण कारवायांमुळे माओवाद्यांचे जाळे कमकुवत होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. गडचिरोली पोलीस दल, सी-60 कमांडो पथक आणि छत्तीसगड पोलिसांच्या समन्वयातून राबविण्यात येणाऱ्या मोहिमांमुळे सीमावर्ती जंगल भागात सुरक्षा यंत्रणांचे वर्चस्व अधिक मजबूत होत आहे.




