(प्रणयकुमार बंडी)
मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षनेते तथा संसदरत्न खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले आहे. “जोमाने कामाला लागा आणि महायुतीला मोठा विजय मिळवून द्या,” असे आवाहन त्यांनी केले.
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार राज्यभर विभागनिहाय आढावा बैठका घेतल्या जात आहेत. उत्तर महाराष्ट्र व मराठवाडा विभागातील बैठका नुकत्याच 17 ऑक्टोबर रोजी पार पडल्या. त्यानंतर आज मुंबई येथे विदर्भ विभागातील आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीत गडचिरोली, गोंदिया, भंडारा, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, रामटेक, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ आणि बुलढाणा जिल्ह्यांतील प्रमुख पदाधिकारी, जिल्हाप्रमुख, संपर्कप्रमुख आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पक्षाच्या संघटनात्मक कामकाजाचा आढावा घेऊन पुढील निवडणुकीच्या रणनितीवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीला केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे, राज्यमंत्री आशिष जयस्वाल, शिवसेना ज्येष्ठ नेते रामदासभाई कदम, आनंदराव अडसूळ, नेत्या मीना कांबळी, आमदार मनिषा कायंदे, तसेच शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, संजय मोरे, राम रेपाळे यांच्यासह सर्व आमदार, जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख व पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीत पक्षाच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामांचा आढावा घेत, पुढील निवडणुकीसाठी प्रभावी नियोजनावर भर देण्यात आला.





