चंद्रपूर, 9 जुलै 2025: ब्रम्हपुरी तालुक्यात सलग दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. 7 जुलै रोजी 108 मिमी तर 8 जुलै रोजी तब्बल 162 मिमी पावसाची नोंद झाल्याने प्रमुख रस्ते व महामार्ग पाण्याखाली गेले आहेत.
या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापनासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले असून, आज तहसील कार्यालय ब्रम्हपुरी येथे उपविभागीय अधिकारी यांच्या उपस्थितीत सर्व संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक पार पडली. यामध्ये तहसीलदार सतीश मासाळ, गटविकास अधिकारी, पोलीस निरीक्षक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंते आणि नगर परिषद अधिकारी उपस्थित होते.
बाधित रस्ते व महामार्ग:
ब्रम्हपुरी – वडसा महामार्ग
आवळगाव – गांगलवाडी
कन्हाळगाव – ब्रम्हपुरी
ब्रम्हपुरी – चांदगाव
दुधवाही – ब्रम्हपुरी
पारडगाव – ब्रम्हपुरी
गोसीखुर्द धरणातील विसर्गात वाढीची शक्यता:
धरणातून सध्या 13,000 क्युसेक विसर्ग सुरू असून, पुढील पावसामुळे यामध्ये वाढ होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
प्रमुख उपाययोजना:
राज्य आपत्ती व्यवस्थापन पथक तैनात
पूरप्रभावित गावांमधील नागरिकांचे स्थलांतर करण्याची तयारी
तालुका नियंत्रण कक्ष कार्यरत – संपर्क क्रमांक: 07177-272073
कोतवाल, पोलीस पाटील, तलाठी, मंडळ अधिकारी यांच्या दक्षता पथकांची स्थापना
गावागावात पूरस्थितीवर सतत नजर
प्रशासनाची भूमिका:
तहसीलदार सतीश मासाळ यांनी सांगितले की, “ब्रम्हपुरी तालुका प्रशासन नागरिकांच्या सुरक्षेसाठी पूर्णपणे सज्ज असून, आपत्ती व्यवस्थापनाच्या सर्व उपाययोजना वेळीच राबवण्यात येत आहेत.”
नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.




