चंद्रपूर, 9 जुलै 2025 – भारतीय हवामान विभागाने चंद्रपूर जिल्ह्यासाठी 7 जुलै रोजी “ऑरेंज अलर्ट” जारी केला असून, पुढील काही दिवसांत अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर वैनगंगा नदीच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे गोसीखुर्द प्रकल्पामधून 16,500 ते 18,000 क्यूमेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंत्यांकडून देण्यात आली आहे.
या संभाव्य पूरस्थितीचा विचार करून ब्रह्मपुरी तालुक्यातील सर्व अंगणवाड्या, पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक शाळा, महाविद्यालये आणि खाजगी कोचिंग क्लासेस यांना दिनांक 10 जुलै 2025 (बुधवार) रोजी एकदिवसीय सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. हा आदेश केवळ ब्रह्मपुरी तालुक्यास मर्यादित असून इतर तहसीलांतील शाळांसाठी लागू राहणार नाही.
जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अंतर्गत मिळालेल्या अधिकारांचा वापर करून हा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही अनुचित घटना टाळण्यासाठी प्रशासनाने हा महत्त्वाचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले आहे.
तथापि, या कालावधीत सर्व शैक्षणिक संस्थांचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या सूचनांनुसार आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज पार पाडावे, अशाही स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.





