गडचिरोली, 09 जुलै 2025 : संयुक्त किसान मोर्चा आणि विविध कामगार संघटनांच्या देशव्यापी बंदच्या पार्श्वभूमीवर गडचिरोलीतही मोठ्या प्रमाणावर आंदोलन पाहायला मिळाले. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील २२ मार्ग बंद असतानाही, सिटू आणि आयटकच्या नेतृत्वात शेकडो महिला कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमून जोरदार घोषणाबाजी केली.
आंदोलनकर्त्यांनी जन सुरक्षा विधेयक व चार श्रमसंहितांचा निषेध करत ते रद्द करण्याची मागणी केली. तसेच खासगीकरण थांबवावे, सर्व कामगारांना किमान २६ हजार रुपये मासिक वेतन द्यावे, तसेच शेतकरी, कामगार, मजुरांसाठी मासिक ५ हजार रुपये पेन्शन लागू करावी, अशी जोरदार मागणी करण्यात आली.
याशिवाय, अंगणवाडी सेविकांच्या वेतनात वाढ, आणि गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जमिनींचे बळजबरीने अधिग्रहण थांबवावे, अशा स्थानिक मागण्याही आंदोलनाच्या केंद्रस्थानी होत्या.
बंद आंदोलनाचा परिणाम शहराच्या दैनंदिन व्यवहारांवरही स्पष्टपणे दिसून आला. बँकांचे व्यवहार पूर्णतः ठप्प झाले, तर जिल्हा परिषद आणि अन्य शासकीय कार्यालयांमधील कामकाजावरही मोठा परिणाम झाला. कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे नागरिकांना विविध सेवांसाठी अडथळ्यांना सामोरे जावे लागले.
शासनाकडून अद्याप आंदोलनावर कोणतीही ठोस प्रतिक्रिया आलेली नसली, तरी कामगार व शेतकरी संघटनांनी संघर्ष अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.





