चंद्रपूर : राज्य शासनाच्या गट-3 व गट-4 पदांसाठी होणाऱ्या स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील उमेदवारांसाठी चंद्रपूर येथील कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्रात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनपर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण 1 ऑगस्ट 2025 पासून सुरू होणार असून 15 नोव्हेंबर 2025 पर्यंत चालणार आहे.
या प्रशिक्षणासाठी इच्छुक उमेदवारांनी 29 जुलै 2025 पर्यंत आवश्यक कागदपत्रांसह (आधार कार्ड, शैक्षणिक कागदपत्रे, जात प्रमाणपत्र, बँक पासबुक) प्रशासकीय भवन, चंद्रपूर येथील मार्गदर्शन केंद्रात नोंदणी फॉर्म सादर करावा.
नोंदणी केलेल्या उमेदवारांची 30 जुलै रोजी मुलाखत घेण्यात येईल, तर 31 जुलै रोजी निवड यादी जाहीर केली जाणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांसाठी 1 ऑगस्टपासून नियमित वर्ग सुरू होतील.
मार्गदर्शन वर्गांमध्ये गणित, इंग्रजी, सामान्यज्ञान व बुद्धिमत्ता चाचणी या चार विषयांचे प्रशिक्षण दिले जाईल. याशिवाय उमेदवारांना चार पुस्तकांचा संच आणि दरमहा 1,000 रुपये विद्यावेतन दिले जाणार आहे.
या उपक्रमाविषयी अधिक माहितीसाठी मनोज सिडाम (मो. 9764580986) यांच्याशी संपर्क साधावा. जिल्ह्यातील सर्व आदिवासी उमेदवारांनी या उपयुक्त योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी रोशन गभाले यांनी केले आहे.





