धुळे : शहरातील जिल्हा रुग्णालयाच्या आवारातून दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत धुळे पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठे यश मिळवले आहे. या कारवाईत तीन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून एकूण १३ चोरीच्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. जप्त वाहनांची एकूण किंमत चार लाख नव्वद हजार रुपये (₹4,90,000) इतकी आहे.
धुळे जिल्हा रुग्णालय परिसरात मागील काही दिवसांपासून मोटारसायकल चोरीच्या घटना वाढल्या होत्या. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनांची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने तपासाची चक्रे फिरवली आणि सापळा रचून टोळीला जेरबंद केले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून चोरीस गेलेल्या विविध कंपन्यांच्या १३ दुचाकींचा तपशील समोर आला आहे. पोलिसांकडून वाहनांचे मूळ मालक शोधण्याचे काम सुरू असून लवकरच वाहने संबंधित मालकांच्या ताब्यात दिली जाणार आहेत.

धुळे पोलिसांच्या या कार्यवाहीमुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून शहरात चोरीच्या घटनांना आळा बसण्यास मदत होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.




