नागपूर : नागपूर मेट्रो रेल्वेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आज तीव्र आंदोलन छेडले. अण्णा भाऊ साठे चौक ते मेट्रो भवन असा भव्य पायी मोर्चा काढण्यात आला, ज्यात १,००० हून अधिक तरुण-तरुणींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
कर्मचाऱ्यांनी मेट्रो प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आणि मेट्रो भवनाच्या गेटसमोर निदर्शने केली. आंदोलनकर्त्यांची प्रमुख मागणी म्हणजे केंद्रीय वेतनश्रेणीनुसार पगार मिळावा. कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की, मेट्रो प्रशासनाने यापूर्वी अनेकदा आश्वासन दिले, मात्र प्रत्यक्षात कोणतीही अंमलबजावणी झालेली नाही.
यामुळेच संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत मेट्रो भवनावर धडक दिली. आंदोलकांच्या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
मेट्रो प्रशासनाच्या भूमिकेकडे आता साऱ्यांचे लक्ष लागले आहे.




