चंद्रपूर : चंद्रपूर शहरात अवैधपणे सुरू असलेल्या ओयो रूम्स/हॉटेल्समुळे अनेक गैरप्रकार घडत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांकडून होत आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किशोर जोरगेवार यांनी शहर महानगरपालिकेचे आयुक्त यांना पत्र लिहून या हॉटेल्सवर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.
प्रमुख समस्या:
1. परवाने व नियमांचे उल्लंघन:
सुमारे 90% ओयो रूम्स/हॉटेल्सने आवश्यक लॉजिंग व बोर्डिंगचे परवाने घेतलेले नाहीत. यामुळे शासनाचा महसूल बुडत आहे.
2. अवैध बांधकामे:
काही हॉटेल्स नजूलच्या जागेवर किंवा इतर सरकारी जमिनीवर विना परवानगी उभारण्यात आली आहेत.
3. गैरप्रकार व सामाजिक परिणाम:
तासांनुसार रूम्स भाड्याने देण्याच्या प्रथेने अनुचित प्रकार घडत आहेत. समाजातील नैतिक मूल्ये ढासळण्याचा धोका निर्माण झाला आहे.
मागणी:
आमदार किशोर जोरगेवार यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन पुढील उपाययोजना करण्याची मागणी केली आहे:
सर्व ओयो रूम्स/हॉटेल्सची परवाने तपासणे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेल्सना तातडीने बंद करणे. सामाजिक आणि नैतिक प्रश्न सोडवण्यासाठी कठोर कारवाई करणे. चंद्रपूर शहराच्या सुरक्षिततेसाठी आणि कायद्याचे पालन सुनिश्चित करण्यासाठी प्रशासनाने या मुद्द्यावर त्वरीत पावले उचलावीत, अशी अपेक्षा आमदार जोरगेवार यांनी व्यक्त केली आहे.




