चंद्रपूर : नागपूर (व्ही.टी.बी.सी.ए.) यांच्या अंतर्गत आयोजित २५ वी सिनीयर व २० वी ज्युनियर राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा नुकतीच येथे उत्साहात पार पडली. या स्पर्धेत विदर्भातील सर्व ११ जिल्ह्यांमधून सुमारे ४०० हून अधिक खेळाडूंनी सहभाग नोंदविला.
२५व्या सिनीयर राज्यस्तरीय स्पर्धेत चंद्रपूर जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनच्या मुलांच्या संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रथम क्रमांक पटकावला. संघाचे नेतृत्व सुरज परसूटकर यांनी प्रभावीपणे केले. त्यांच्या नेतृत्वाखाली संघाने संपूर्ण स्पर्धेत सातत्यपूर्ण आणि दमदार कामगिरी करत विजेतेपद मिळवले.
तसेच सिनीयर मुलींच्या गटात कु. रुचिता आंबेकर हिने संघाचे नेतृत्व करत उल्लेखनीय कामगिरी बजावली आणि द्वितीय क्रमांक मिळविला. ज्युनियर मुलींच्या गटातही चंद्रपूर जिल्ह्याच्या संघाने चांगली खेळी साकारत तृतीय क्रमांकावर समाधान मानले.
चंद्रपूर जिल्ह्याच्या या उल्लेखनीय यशाबद्दल खेळाडू, प्रशिक्षक आणि पदाधिकाऱ्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे. या यशामुळे जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रातील प्रतिष्ठेत भर पडली आहे.
खेळाडूंना प्रशिक्षक व मार्गदर्शक म्हणून चंद्रपूर जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे सचिव प्रा. विक्की तुळशीराम पेटकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या सातत्यपूर्ण प्रशिक्षण व सहकार्यामुळे अनेक खेळाडूंनी आजवर उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
या यशाबद्दल विदर्भ टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजय हिवरकर, सचिव राजकुमार कैथवास तसेच चंद्रपूर जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अनिस अहमद खान, उपाध्यक्ष डॉ. विशाल शिंदे, श्री. पुरुषोत्तम आगलावे, सचिव प्रा. विक्की तुळशीराम पेटकर, सहसचिव श्री. सूरज परसूटकर, सल्लागार डॉ. महेशचंद शर्मा, कोषाध्यक्ष कु. रुचिता आंबेकर, सहकोषाध्यक्ष कु. श्रुती घटे, सदस्य सौ. वर्षा घटे, हर्षल क्षिरसागर, बंडू डोहे, इखलाक पठान, चंद्रकांत परसूटकर तसेच डॉ. पुरुषोत्तम माहोरे, डॉ. निखिल देशमुख आणि डॉ. सुनील चिकटे यांनी खेळाडूंचे कौतुक करून अभिनंदन केले.




