चंद्रपूर | महायुतीच्या दृष्टीने महत्त्वाचा राजकीय निर्णय घेण्यात आला असून युवासेनेचे लोकसभा अध्यक्ष गणेश महल्ले यांनी नगरसेवक पदाच्या उमेदवारीचा अर्ज मागे घेतला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच युवासेना मुख्य सचिव राहुल लोढे यांच्या थेट फोन व स्पष्ट आदेशानंतर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे.
या संपूर्ण प्रक्रियेत किरण पांडव आणि हर्षल शिंदे यांनी महत्त्वाची भूमिका बजावत गणेश महल्ले यांची मनधरणी केली. यावेळी जिल्हा प्रमुख युवराज धनोरकर आणि शैलेश केळझरकर उपस्थित होते.
नेतृत्वाकडून स्पष्ट संदेश देण्यात आला की, “गणेश, तू पक्षासाठी लढणारा योद्धा आहेस. पूर्ण ताकदीने काम कर. आम्ही तुझ्या पाठीशी ठाम आहोत. महायुतीला प्रत्येक जागेवर विजय मिळवून द्यायचा आहे.”
या निर्णायक पावलामुळे चंद्रपूरच्या स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, महायुतीची एकजूट, शिस्तबद्ध नेतृत्व आणि आक्रमक निवडणूक रणनीती पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महायुतीसाठी राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.




