नागपूर | नागपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025–26 साठी निवडणूक यंत्रणा पूर्णतः सज्ज झाली असून, मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रशासनाने व्यापक तयारी सुरू केली आहे. मतदारांमध्ये जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने शहरभर ‘मतदार जागरूकता’ मोहीम राबवण्यात येत आहे.
या मोहिमेअंतर्गत नागपूर शहरातील तब्बल ३३५ ठिकाणी मतदान जनजागृती संदर्भातील फलक लावण्यात येत असून, नागरिकांना मतदानाचे महत्त्व पटवून देण्यावर भर देण्यात आला आहे. येत्या १५ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या मतदानासाठी अधिकाधिक मतदारांनी आपला हक्क बजावावा, यासाठी प्रशासन विविध माध्यमांचा प्रभावी वापर करत आहे.
महानगरपालिका प्रशासनाकडून बॅनर, फलक, पोस्टर्स, सोशल मीडियासह इतर प्रचार माध्यमांद्वारे मतदानाबाबत जागरूकता निर्माण केली जात आहे. “लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक मत महत्त्वाचे आहे,” हा संदेश या मोहिमेतून नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
प्रशासनाच्या या प्रयत्नांमुळे यावेळी नागपूर महानगरपालिका निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.




