कोरपना (चंद्रपूर) : कोरपना तालुक्यातील ऐतिहासिक आणि आध्यात्मिक वारसा लाभलेल्या गणेशमोड येथील श्रीदत्त मंदिरात बुधवार, दिनांक ३ डिसेंबरपासून तीन दिवसीय श्री दत्त जयंती उत्सवाला सुरुवात झाली. विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी यंदाचा उत्सव अधिक आकर्षक ठरणार आहे.
गुरुवार, ४ डिसेंबर रोजी दत्त जयंतीच्या औचित्यावर सकाळी साडेपाच वाजता सामुदायिक प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर आरती, पूजा-पाठ पार पडले. सकाळी ११.३० वाजता ह.भ.प. विठ्ठल महाराज डाखरे यांचे काल्याचे कीर्तन, तसेच काला फोडण्याचा कार्यक्रम चैतन्य महाराज वढा यांच्या शुभहस्ते आयोजित करण्यात आला. यावेळी शिक्षक आमदार सुधाकर अडबाले व वास्तुशास्त्रज्ञ बापूजी धोटे यांचा सत्कार सोहळाही आयोजित करण्यात आला. सायंकाळी ५.३० वाजता सामुदायिक प्रार्थनेने दिवसाचा समारोप करण्यात आला.
शुक्रवार, ५ डिसेंबर रोजी सकाळी साडेपाच वाजता सामुदायिक ध्यान, आरती व पूजा-पाठ होणार आहेत. दुपारी ११.१५ वाजता ह.भ.प. जाधव महाराज, ह.भ.प. गुरनुले महाराज, ह.भ.प. किनाके महाराज, ह.भ.प. मीनाथ महाराज आणि ह.भ.प. भेंडाळे महाराज यांचे प्रवचन व कीर्तन प्रबोधनाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी सव्वा पाच वाजता सामुदायिक प्रार्थनेने उत्सवाचा समारोप होणार आहे.
यादरम्यान भव्य भजन स्पर्धा आयोजित करण्यात आली असून मोठ्या संख्येने भाविकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन श्री दत्त संस्थानचे अध्यक्ष वसंत मडावी, उपाध्यक्ष शशिकांत आडकिने, सचिव डॉ. अरुण ठाकरे, सहसचिव दिलीप जेनेकर, कोषाध्यक्ष घनश्याम नांदेकर व विश्वस्त देवाजी हुलके, सुभाष वडस्कर, गजानन खामनकर, पुंडलिक उलमाले आणि विठ्ठल पिंपळकर यांनी केले आहे.
देवस्थानाचे महात्म्य
गणेशमोड–देवघाट हे क्षेत्र पुरातन काळापासून ऐतिहासिक, आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण मानले जाते. देवघाट नाल्यावरील पुलाच्या पायव्याचे खोदकाम करताना येथील मजुरांना त्रिमुखी दत्तदेवतेची मूर्ती आढळून आली. स्थानिकांच्या सहभागातून मूर्तीची विधीवत प्रतिष्ठापना करण्यात आली. काही वर्षांनी यात्रेला प्रारंभ झाला आणि आज या ठिकाणचा उत्सव महाराष्ट्र तसेच तेलंगणातून येणाऱ्या हजारो भाविकांचे आकर्षण बनला आहे.




