पंढरपूर : कार्तिकी एकादशीच्या शुभदिनी आज पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व शिवसेना प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब शासकीय महापूजा केली.
“सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, कर कटावरी ठेवोनिया…” या भावपूर्ण स्तोत्राच्या वातावरणात विठ्ठलाचे दर्शन घेत शिंदे यांनी राज्यातील बळीराजाच्या समृद्धीसाठी आणि सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी प्रार्थना केली.
या पवित्र प्रसंगी त्यांनी विठुरायाच्या चरणी नतमस्तक होत — “राज्यातील शेतकरी सुखी, समाधानी आणि आनंदी राहो, त्याच्यावर येणारी सर्व संकटे दूर होवोत” — असे साकडे घातले.
या शासकीय महापूजेदरम्यान नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील पोटा गावचे रामराव आणि सुशीलाबाई वालेगावकर यांची यंदा ‘मानाचे वारकरी’ म्हणून निवड करण्यात आली होती. तसेच प्रथमच जिल्हा परिषद शाळेतील दोन विद्यार्थ्यांना महापूजेमध्ये सहभागी करून घेण्यात आले, ही एक अनोखी आणि प्रेरणादायी बाब ठरली.
या प्रसंगी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यासह त्यांचे वडील संभाजी शिंदे, पत्नी लता शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, सून वृषाली शिंदे, नातू रुद्रांश शिंदे उपस्थित होते.
तसेच मंत्री जयकुमार गोरे, मंत्री भरतशेठ गोगावले, श्री विठ्ठल रखुमाई मंदिराचे विश्वस्त गहिनीनाथ महाराज औसेकर, तसेच प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी आणि हजारो वारकरी भाविकांनी या महापूजेत सहभाग घेतला.




