मुंबई : वातावरणीय बदल आणि पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रात भारताचे नेतृत्व अधोरेखित करणारी ‘मुंबई क्लायमेट वीक’ ही आंतरराष्ट्रीय परिषद फेब्रुवारी 2026 मध्ये मुंबईत पार पडणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मंत्रालयातील समिती कक्षात झालेल्या बैठकीत या उपक्रमाची अधिकृत घोषणा करण्यात आली.
ही परिषद ‘प्रोजेक्ट मुंबई’ या संस्थेच्या संकल्पनेतून, महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभाग तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या सहकार्याने आयोजित केली जाणार आहे.
बैठकीस पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, महापालिका आयुक्त भूषण गगराणी, विभागाच्या सचिव जयश्री भोज, ‘प्रोजेक्ट मुंबई’चे सीईओ शिशिर जोशी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “विकसनशील देशांतील वातावरणीय बदल, अन्न व ऊर्जा टंचाईच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. विकास आणि पर्यावरणीय कृती यांच्यात संतुलन साधण्यासाठी ‘मुंबई क्लायमेट वीक’ प्रभावी भूमिका बजावेल.”
मुख्य कार्यक्रम १७ ते १९ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर, मुंबई येथे होणार आहे. नागरिकांच्या सहभागासाठी शहरभर विविध प्रदर्शने, कार्यशाळा, चित्रपट, कला, क्रीडा, आरोग्य, अध्यात्म आणि क्लायमेट फूड फेस्टिव्हल आयोजित केले जाणार आहेत.
या परिषदेत ग्लोबल साऊथमधील ३० पेक्षा अधिक देशांचे प्रतिनिधी सहभागी होणार असून, हवामान बदलासाठी व्यवहार्य कृती आराखडा तयार केला जाईल. या प्रक्रियेत राज्यांचे मुख्यमंत्री, शहर प्रतिनिधी, उद्योग, सामाजिक संस्था, विद्यार्थी आणि युवक यांचा सक्रिय सहभाग असणार आहे.
कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ‘मुंबई क्लायमेट वीक’चा लोगो अनावरण करण्यात आला आणि उपक्रमाची माहितीपट सादर करण्यात आली.
मुख्यमंत्री म्हणाले, “मुंबई हवामान सप्ताह भारताच्या कृतीशील नेतृत्वाचे प्रतीक आहे. पंतप्रधानांच्या दृष्टिकोनातून प्रेरणा घेत मुंबई आणि महाराष्ट्र जागतिक दक्षिणेसाठी न्याय्य, नाविन्यपूर्ण आणि शाश्वत हवामान भविष्य घडवण्यास कटिबद्ध आहेत. आता कृती करण्याची वेळ आली आहे — प्रत्येक नागरिक, उद्योग आणि क्षेत्राला हवामान मोहिमेत सहभागी व्हावे लागेल.”
या परिषदेत तीन प्रमुख विषयांवर भर असेल — अन्न प्रणाली, ऊर्जा संक्रमण आणि शहरी सक्षमता. न्याय, नवोन्मेष आणि वित्तीय दृष्टिकोनातून हे विषय सखोलपणे मांडले जाणार आहेत.
‘प्रोजेक्ट मुंबई’चे संस्थापक शिशिर जोशी म्हणाले, “मुंबई क्लायमेट वीक हा महाराष्ट्र आणि भारतासाठी एक ऐतिहासिक क्षण ठरणार आहे. लोकसहभागातून वातावरणीय बदलाला तोंड देण्यासाठी शाश्वत उपाय येथे मांडले जातील.”
या उपक्रमाचे नॉलेज पार्टनर मॉनिटर डिलॉईट असणार असून, क्लायमेट ग्रुप, इंडिया क्लायमेट कोलॅबोरेटिव्ह, वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट (इंडिया), एव्हरसोर्स, एचटी पारेख फाउंडेशन, युनिसेफ, शक्ती फाउंडेशन, रेनमॅटर फाउंडेशन, नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट आणि राष्ट्रीय सेवा योजना (NSS) या संस्था सहभागी होणार आहेत.
यावेळी मुख्यमंत्री कार्यालयातील अपर मुख्य सचिव अश्विनी भिडे, सचिव डॉ. श्रीकर परदेशी, मुख्य आर्थिक सल्लागार कौस्तुभ धवसे, तसेच ‘प्रोजेक्ट मुंबई’चे सल्लागार रिधम देसाई आणि जलज दाणी उपस्थित होते.
मुंबई क्लायमेट वीक हा भारताच्या नेतृत्वाखालील ग्लोबल साऊथसाठीचे हवामान कृती व्यासपीठ ठरणार असून, पर्यावरणीय परिवर्तनाच्या नव्या पर्वाची सुरुवात मुंबईतून होणार आहे.




