चंद्रपूर – राज्याचे उद्योग, सार्वजनिक बांधकाम, उच्च व तंत्रशिक्षण, आदिवासी विकास, पर्यटन, मृद व जलसंधारण विभागाचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी शुक्रवारी शासकीय विश्रामगृह येथे विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेतला.
या बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता सोनाली चव्हाण, कार्यकारी अभियंते मुकेश टांगले, अक्षय पगारे, जया ठाकरे, प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार, प्रणीव लाटकर, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक ऋतुराज सुर्या, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी निशांत गिरी, जलसंधारण अधिकारी निलिमा मंडपे, राजीव कक्कड, नितीन भटारकर आदी अधिकारी उपस्थित होते.
बैठकीदरम्यान राज्यमंत्री नाईक म्हणाले की, सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कामे मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. शासनाचे धोरण बेरोजगारांना संधी उपलब्ध करून देण्याचे असल्याने विभागाने नियमानुसार पात्र अभियंत्यांना कामे द्यावीत, असे निर्देश त्यांनी दिले.
तसेच त्यांनी चंद्रपूरमधील रस्त्यांची दुर्दशा लक्षात घेत, ठिकठिकाणी पडलेले गड्डे तातडीने बुजवावेत, अशी सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाला केली.
आदिवासी विकास विभागाने लाडपागे समितीच्या शिफारसीनुसार पात्र उमेदवारांची त्वरीत नियुक्ती करावी, यात कोणतीही टाळाटाळ होऊ नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.
उद्योग क्षेत्राबाबत बोलताना नाईक म्हणाले, “चंद्रपूर हा औद्योगिक जिल्हा असून स्थानिक उद्योजकांच्या अडचणी जाणून घेऊन त्या प्राधान्याने सोडवाव्यात. तसेच स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे धोरण राबवावे.”
राज्यमंत्री नाईक यांनी बैठकीदरम्यान विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना नागरिकाभिमुख कामकाजावर भर देण्याचे निर्देश दिले.




